भारतात होणारा हा कसोटी सामना गुलाबी बॉलने खेळवला जाणार

दुलीप ट्रॉफीनंतर आता भारत अ विरुद्ध न्यूझिलंड अ संघात होणारा दुसरा अनधिकृत कसोटी सामना गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. हा सामना ३० सप्टेंबरला सुरु होईल. नवीन बांधलेल्या डॉ. गोकाराजू लीला गंगाराजू, आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होईल. परंतु सामना सुविधेंच्या अभावी प्रकाशझोतात होणार नाही.

बीसीसीआयने न्यूझिलंड क्रिकेट बोर्डाशी यावर चर्चा केली आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये ऑकलँडला होणाऱ्या न्यूजीलँड विरुद्ध इंग्लंड पहिल्या डे नाईट कसोटी सामन्याला मंजुरी मिळाल्यानंतर न्यूजीलँड क्रिकेट बोर्डाने गुलाबी बॉलने खेळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

याआधी भारतात दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात गुलाबी बॉलचा वापर करण्यात आला होता. सध्याच्या भारत अ संघातील चौदापैकी १० खेळाडू त्या सामन्यात खेळले होते. भारत अ संघाने पहिली कसोटी एक डाव आणि ३१ धावांनी जिंकली होती. या सामन्यात करण शर्मा आणि शादाब नदीमने मिळून १६ विकेट्स घेतल्या होत्या.