आनंद लुटण्यासाठी, फिट राहण्यासाठी खेळा – राजवर्धनसिंग राठोड

पुणे। इतकी वर्षे खेळाकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. त्याची भरपाई आता आपल्याला करायची आहे. आपले खेळाडू ऑलिम्पिक मेडल जिंकणार आहेतच, पण खेळाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाने खेळायला पाहिजे. आनंद लुटण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी खेळा, असा संदेश केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी खेलो इंडिया स्पोर्टस् एक्स्पोमध्ये खेळाडूंना दिला.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन समितीतर्फे नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. ने आयोजित केलेला एक्स्पो भरविण्यात आला आहे. यावेळी आशिष पेंडसे यांसह क्रीडा अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी शुभेच्छा फलकावर ५ मिनीट और खेलो इंडिया असा संदेश देत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कबड्डीमध्ये मैदानावर खेळाडूंसोबत सहभागी होत राठोड यांनीही खेळाचा आनंद लुटला. याशिवाय टेबल टेनिस, टिपरी पाणी या खेळांसोबतच फुटबॉल खेळून त्यांनी युवावर्गाला प्रोत्साहित केले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याकरीता गर्दी केली होती.

स्पोटर्स एक्स्पोमध्ये ६० विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. खेळाडूंचे करियर, विकास आणि तंत्रज्ञानाविषयी यामध्ये माहिती देण्यात येत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा, याकरीता धर्नुविद्या, लगोरी, रिले, वॉल क्लायम्बिंग, गोटया, फुटबॉल यांसारखे खेळ आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दिनांक २० जानेवारीपर्यंत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना पाहण्याकरीता खुले राहणार आहे.