२००७ विश्वचषकात खेळलेले हे ५ खेळाडू खेळणार २०१९ विश्वचषकातही

क्रिकेट विश्वचषक २०१९ला आता केवळ १२ दिवस राहिले आहेत. इंग्लंडमध्ये होणारा हा विश्वचषक ३० मे पासून सुरू होणार आहे.

या विश्वचषकात अनेक सिनीयर खेळाडू खेळणार आहेत. त्यातील काही खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक आहे.

भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आपला शेवटचा विश्वचषक खेळत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धोनी २००७, २०११ आणि २०१५चे विश्वचषक खेळला आहे.

यामुळे या विश्वचषकात २००७ साली धोनीप्रमाणेच विश्वचषक खेळलेल्या कोणकोणत्या खेळाडूंचा सहभाग असेल याची मोठी चर्चा आहे.

भारत-

या विश्वचषकात खेळलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनी, युवराज सिंग आणि हरभजन सिंग, दिनेश कार्तिक आणि इरफान पठाण या खेळाडूंनी अजून निवृत्ती घेतलेली नाही. परंतु यातील एमएस धोनी हा विश्वचषक खेळणार हे जवळपास निश्चित असून दिनेश कार्तिकबद्दल संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

न्यूझीलंड-

न्यूझीलंडने आज विश्वचषकासाठी आपली १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यात राॅस टेलरचा समावेश आहे. टेलर २००७, २०११ आणि २०१५ असे तीन विश्वचषक खेळला आहे.

श्रीलंका-

श्रीलंकेसाठी २००७ विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंमध्ये केवळ लसिथ मलिंगा या विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे. टेलरप्रमाणेच मलिंगा २००७, २०११ आणि २०१५ असे तीन विश्वचषक खेळला आहे.

पाकिस्तान-

पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये शोएब मलिक आणि मोहम्मद हफिज हे दोन खेळाडू या विश्वचषकात खेळण्याची शक्यता आहे. हफिज २००७, २०११ आणि २०१५ विश्वचषक खेळला आहे. यातील शोएब मलिकने तर १९९९मध्येच पदार्पण केले होते. परंतु त्याला २००३ विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच २०११ विश्वचषकातही त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो तेव्हा पाकिस्तानच्या संभाव्य ३० खेळाडूंमध्येही नव्हता. २००७ आणि २०१५ विश्वचषकानंतर मलिक आता थेट २०१९ खेळणार आहे.

बांगलादेश-

२००७, २०११ आणि २०१५ विश्वचषकात बांगलादेशकडून मुशफिकुर रहिम, तमिम इक्बाल, मर्शफी मुर्तझा आणि शाकिब अल हसन हे चार खेळाडू खेळले आहेत. या विश्वचषकात जर चौघांचीही निवड झाली तर बांगलादेशकडून ४ विश्वचषक खेळणारे ते पहिले खेळाडू ठरणार आहे. मर्शफी मुर्तझा हा गेल्याच वर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत खासदार झाला आहे आणि २०१९ विश्वचषक आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे त्याने घोषीत केले आहे.

विंडीज-

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आपला ५वा विश्वचषक खेळणार आहे. गेलने २००३, २००७, २०११ आणि २०१५ विश्वचषकात भाग घेतला आहे. त्याला जर या विश्वचषकात संधी मिळाली तर ५ खंडात विश्वचषक खेळणारा तो जगातील ५वा खेळाडू ठरेल. यापुर्वी सचिन तेंडूलकर, सनथ जयसुर्या, इंझमाम उल हक आणि सनथ जयसुर्या यांनी आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडात विश्वचषक खेळला आहे. गेलप्रमाणेच त्याचा २००७ विश्वचषकातील संघसहकारी मार्लेन सॅम्युअलला मात्र त्यानंतर कोणत्याही विश्वचषकात संधी मिळालेली नाही. त्याने अजून निवृत्ती घोषीत केलेली नाही आणि डिसेंबर २०१८मध्ये तो शेवटचा वनडे सामना खेळला आहे.

इंग्लंड- 

लायम प्लंकेट हा इंग्लंडचा एकमेव खेळाडू आहे जो २००७ विश्वचषकात खेळला आहे आणि त्याला २०१९ विश्वचषकातही संधी मिळू शकते. त्याला २०११ आणि २०१५ विश्वचषकात मात्र संधी मिळाली नव्हती. जेम्स अॅडरसन, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्राॅड हे तीन खेळाडू २००७, २०११ आणि २०१५ विश्वचषक खेळले आहेत परंतु यातील रवी बोपारा २०१५ मध्ये शेवटचा सामना खेळला आहे. तर जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्राॅड हे आता मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळत नाहीत.

दक्षिण आफ्रिका- 

आफ्रिकेच्या एबी डिव्हिलीयर्सला देखील सलग चौथा विश्वचषक खेळण्याची संधी होती. त्याने २००७, २०११ आणि २०१५ विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात भाग घेतला आहे. परंतु गेल्यावर्षी या महान खेळाडूने क्रिकेटला अलविदा केला.

ऑस्ट्रेलिया-

२००७मध्ये विश्वचषक खेळलेल्या ऑस्ट्रेलिया संघातील सर्वच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. २००७  संघातील एकही खेळाडू २०१९ विश्वचषकात खेळताना दिसणार नाही.

अफगाणिस्तान-

अफगाणिस्तान संघ २०१५मध्ये आपला पहिला विश्वचषक खेळला. त्यानंतर या संघाने जबरदस्त प्रगती केली आहे. २०१९ विश्वचषकातील एक डार्क हाॅर्स संघ म्हणून या संघाकडे पाहिले जात आहे.

२००७साली विश्वचषक खेळलेल्या या खेळाडूंना २०१९मध्ये मिळू शकते विश्वचषकात संधी-

एमएस धोनी (भारत), दिनेश कार्तिक (भारत), लायम प्लंकेट (इंग्लंड), ख्रीस गेल (विंडीज), मार्लेन सॅम्युअल (विंडीज), मर्शफी मुर्तझा (बांगलादेश), मुशफिकुर रहिम(बांगलादेश), तमिम इक्बाल(बांगलादेश), शाकिब अल हसन (बांगलादेश), शोएब मलिक (पाकिस्तान), मोहम्मद हफिज (पाकिस्तान), लसिथ मलिंगा (श्रीलंका), राॅस टेलर (न्यूझीलंड).

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.