अनसोल्ड ११ खेळाडूंचा संघ जो आयपीएलमधील कोणत्याही संघाला करू शकतो पराभूत

आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या लीलालाव नुकताच २७ आणि २८ जानेवारीला पार पडला. या लिलावात अनेक अनुभवी तसेच नवोदित तरुण खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना बोली लागणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. त्याप्रमाणे या लिलावात अनेक नवीन खेळाडूंची नावे समोर आली.

फ्रॅन्चायझींनीही या लिलावात तरुण खेळाडूंना जास्त पसंती दर्शवली, मात्र यामुळे बऱ्याच अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना मात्र बोलीही लागली नाही तर काही खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीतच खरेदी करण्यात आले.

या बोली न लागलेल्या खेळाडूंचा एक संघ करायचा ठरवला तरी चांगला आणि मजबूत संघ तयार होऊ शकतो.

असेच हे ११ खेळाडू ज्यांना आयपीएल २०१८ लिलावात खरेदीदारच मिळाला नाही.

१. ड्वेन स्मिथ: विंडीजचा सलामीवीर फलंदाज असणारा ड्वेन स्मिथची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे. तसेच त्याला आयपीएलचा अनुभवही भरपूर आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स अशा संघांकडून खेळताना त्याने सलामीला चांगली फलंदाजी केली आहे. स्मिथने आत्तापर्यंत ९१ सामन्यांमध्ये २३८५ धावा केल्या आहेत. तसेच गरज असेल तेव्हा त्याने त्याच्या संघासाठी गोलंदाजीची केलेली आहे. त्याच्या नावावर एकूण २६ बळी आहेत.

२. मार्टिन गप्टिल: वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांपैकी एक असणारा मार्टिन गप्टिल यावर्षी आयपीएलच्या फ्रॅन्चायझींना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. गप्टिल हा न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज आहे. तो २०१६ आणि २०१७ हे दोन वर्षे आयपीएलमध्ये खेळला आहे. या दोन्ही वर्षी त्याला तसे कमी सामने खेळायला मिळाले. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १० सामने खेळले, यात त्याला २१ च्या सरासरीने १८९ धावा करता आल्या आहेत.

३. हाशिम अमला: दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम अमला आयपीएलमध्ये मागील वर्षी चांगलाच चमकला होता. मात्र तरीही त्याच्यावर यावर्षी बोली लागली नाही. तोही २०१६ आणि २०१७ च्या आयपीएलचा मोसम खेळला. त्याला २०१६ ला जास्त संधी मिळाली नाही मात्र २०१७ ला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना त्याने २ शतकांसह ६० च्या सरासरीने १० सामन्यात ४२० धावा केल्या होत्या. त्याच्यासाठी हा मोसम चांगलाच यशस्वी ठरला होता.

४. जो रूट: इंग्लंडचा कर्णधार असलेला आणि सध्याच्या फॅब फोर फलंदाजांपैकी एक असलेला जो रूटसाठी आयपीएलच्या यावर्षीच्या मोसमासाठी कोणत्याही फ्रॅन्चायझींनी पसंती दर्शवली नाही. कदाचित रूटला आयपीएलचा नसलेला अनुभव कारणीभूत ठरला असण्याची शक्यता आहे. तसेच तो संपूर्ण मोसमासाठीही उपलब्ध नव्हता त्यामुळे कदाचित फ्रॅन्चायझींनी त्याला बोली लावली नसावी. मात्र रूटची आंतराष्ट्रीय टी२० ची कारकीर्द चांगली राहिली आहे. त्याने २५ अंतराष्ट्रीय टी २० सामन्यात खेळताना ३९.१० च्या सरासरीने ७४३ धावा केल्या आहेत.

५. कोरे अँडरसन: न्यूझीलंडचा आणखी एक आक्रमक फलंदाज कोरे अँडरसन यावर्षीच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला. त्याची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळला आहे. त्याने फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही आपले योगदान दिले आहे. आजपर्यंत २७ आयपीएल सामने खेळताना अँडरसनने २७.४२ च्या सरासरीने ५२१ धावा केल्या आहेत. तसेच ८ बळीही घेतले आहेत.

६. शॉन मार्श: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज असलेला आणि सध्या चांगला फॉर्ममध्येही असलेला शॉन मार्श आयपीएलमध्येही चांगला खेळला आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या ऍशेस मालिकेत चांगली कामगिरी केली होती. २००८ च्या पहिल्या आयपीएल मोसमात मार्श सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने आत्तापर्यंत ७१ सामन्यात खेळताना २४७७ धावा केल्या आहेत. तसेच तो ज्या ज्या आयपीएल मोसमात खेळला त्या प्रत्येक मोसमात किंग इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे.

७. निरोशन डिकवेल्ला: तळाच्या फळीला मजबूत करणारा निरोशन डिकवेल्ला यष्टिरक्षणही करतो. श्रीलंकेकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव नाही आणि हीच गोष्ट कदाचित लिलावाच्या वेळी त्याच्या विरोधात गेली असण्याची शक्यता आहे. परंतु त्याची आंतराष्ट्रीय टी २० तील कामगिरी उत्तम राहिली आहे.

८.मोर्ने मॉर्केल: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलला आयपीएल खेळण्याचा चांगला अनुभव आहे. २०१२ च्या आयपीएल मोसमात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला होता. तसेच २००९ ते २०१६ या आयपीएलच्या मोसमात मॉर्केल खेळला आहे. त्याने आतापर्यंत ७० आयपीएल सामने खेळताना २७.१३ च्या सरासरीने ७७ बळी घेतले आहेत. एवढा अनुभव असतानाही मॉर्केल यावर्षीच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला आहे.

९. डेल स्टेन: दक्षिण आफ्रिकेचाच दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन आयपीएल २०१८ च्या लिलावात अनसोल्ड राहिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कसोटीमध्ये ४०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या या अनुभवी गोलंदाजाला मागील काही महिन्यांपासून दुखापतीने घेरले आहे. त्यामुळे फ्रॅन्चायझींनी त्याच्याकडे पाठ फिरवली असू शकते. परंतु स्टेनचा आयपीएलमधील अनुभवही चांगला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलचे ९० सामने खेळले आहेत, यात त्याने २५.०६ च्या सरासरीने ९२ बळीही घेतले आहेत.

१०. ऍडम झाम्पा: पुण्याकडून खेळताना या खेळाडूने २०१६मध्ये ५ सामन्यात १२ तर २०१७मध्ये ६ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी देखील दोन्ही मोसमात मिळून १४.६३ एवढी चांगली आहे.

११. इशांत शर्मा: भारताचा अनुभवी गोलंदाज असलेला इशांत शर्माला २०१८च्या आयपीएल लिलावात मात्र बोली लागली नाही. इशांत शर्माची कामगिरीही तशी टी २० मध्ये बरी आहे परंतु त्याचा अनुभव चांगला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण ७६ सामने खेळले आहेत. यात त्याला ३७.८१ च्या सरासरीने ५९ बळी घेण्यात यश मिळाले आहे.