प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेत यजमान प्रबोधन आणि पय्याडे उपांत्य फेरीत

मुंबई |  सलामवीर शशांक सिंग याचे शानदार शतक आणि त्याने कौस्तुभ पवारसह दुसऱया विकेटसाठी केलेल्या 139 धावांच्या भागीमुळे सिंध क्रिकेट क्लबचा केवळ एका विकेटने पराभव करून प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली.

सिंध क्रिकेट क्लबच्या 4 बाद 212 या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना प्रबोधनने 19.3 षटकांमध्ये 9 बाद 216 धावा केल्या. यांची गाठ पय्याडे स्पोर्टसशी पडेल. आज पय्याडेने आपले प्रतिस्पर्धी न्यू हिंद स्पोर्टिंग समोर 196 धावांचे आव्हान ठेवले व त्यांना 9 बाद 159 धावांवर रोखले.

विजयी संघाला 5 बाद 56 अशा कठीण अवस्थेतून बाहेर काढताना कर्णधार पराग खानापूरकर याने 48 चेंडूत 71 धावा फटकावल्या.

सिंध संघाला यजमानानी प्रथम फलंदाजी दिली. त्याचा फायदा घेत अंकित रेवंडकर (49) आणि कृषाल शहा (26) यांनी 56 धावांची सलामी दिली. 12व्या षटकापर्यंत 3/95 अशी मजल सिंधने मग कशीबशी मारली.

त्यानंतर आलेल्या अल्पेश रामजनी याने केवळ 33 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावताना 10 षटकार खेचले आणि त्याचबरोबर आपल्या संघाला दोनशेचा टप्पा पार करून दिला.

प्रबोधननेही सुरवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. शशांक सिंग आणि डी. सुब्रमण्यम (28) यांनी 37 धावांची सलामी दिल्यावर शशांकने कौस्तुभ पवार (56) याच्या मदतीने 139 धावा दुसऱया विकेटसाठी जोडल्या.

15व्या षटका अखेर प्रबोधन 3 बाद 193 अशा सुस्थितीत होता. पण त्यानंतर सर्वेश दामले आणि योगेश ताकवले हे अनुभवी खेळाडू झटपट बाद झाले आणि प्रबोधनची कोंडी झाली. 4 बाद 207 वरून 213 चे लक्ष्य पार करेपर्यंत 5 फलंदाज बाद झाले.

अकरा क्रमांकावरच्या विनित सिन्हाने चौकार ठोकून आपल्या संघाला विजयी केले. अल्पेश रामजनीने 28 धावात 3 गडी बाद केले. पण आज त्याचा दिवस नव्हता.

पय्याडेला जय बिस्ता आणि हर्ष टांक यांनी 43 धावांची सलामी दिली. त्यानंतर वैभव माळीने दोघांना बाद केल्याने पय्याडेची घसरगुंडी उडाली. थोडय़ाच वेळात 5 बाद 56 अशी त्यांची अवस्था झाली. पराग खानापूरकरने मग प्रथम आपले बस्तान बसविले व त्यानंतर स्वैर फटकेबाजी केली.

त्याने हरमीत सिंग (31) आणि अंकूर सिंग (19) यांच्यासह सातव्या आणि आठव्या विकेटसाठी अनुक्रमे 39 आणि 45 धावांच्या भागीदाऱया करून 8 बाद 195 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली.

न्यू हिंदचीही अवस्था सुरुवातीलाच 4 बाद 47 अशी झाली. कौस्तुभ कोळंबकर (50) आणि अक्षय जांभेकर (40) यांनी 48 चेंडूत 80 धावांची भागी उभारून आपल्या संघाच्या आशा काही काळ उंचावल्या पण 127 वर कौस्तुभ सावंतने कोळंबकरचा त्रिफळा उडविला आणि पाठोपाठ अक्षयलाही टांकद्वारे झेलबाद केले आणि पय्याडेचा मार्ग सुलभ केला.

रायस्टंड डायस् याने दोन बळी घेताना परिक्षित वळसंगकर सारख्या महत्वाच्या खेळाडूला बाद केले. डावरा स्पिनर हरमीत सिंगनेही 19 धावात 2 बळी घेऊन प्रतिस्पर्धांच्या धावसंख्येला आळा घातला.

संक्षिप्त धावफलक – सिंध क्रिकेट क्लब 20 षटकांत 4 बाद 292 (कृषल शहा 26, अंकित रेवंडकर 49, अमीर भोरानिया 26, अल्पेश रामजानी नाबाद 80, कर्ष कोठारी 25/2) पराभूत वि. प्रबोधन 19.3 षटकांत 9 बाद 216 (डी. सुब्रमण्यम 28, शशांक सिंग 100, कौस्तुभ पवार 56, अल्पेश रामजानी 28/3, वैभव सिंग 40/2, शहिद खान 49/2) सामनावीर – शशांक सिंग

पय्याडे स्पोर्टस 20 षटकात 8 बाद 195 (हर्ष टांक 24, जय बिस्ता 20, पराग खानापूरकर नाबाद 71, हरमीत सिंग 31, वैभव माळी 48/4) विजयी वि. न्यू हिंद स्पोर्टिंग 20 षटकांमध्ये 9 बाद 159 (कौस्तुभ कोळंबकर 50, अक्षय जांभेकर 40, हरमीत सिंग 19/2, कल्पेश सावंत 15/2, रॉयस्टन डायस 16/2) सामनावीर पराग खानापूरकर.