परदीप नरवाल पुढच्या मोसमात खेळणार या संघाकडून

मुंबई । पाटणा पायरेट्सचा कर्णधार परदीप नरवाल येत्या मोसमात उत्तराखंडकडून न खेळता हरियाणा संघाकडून खेळताना दिसेल. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हा खेळाडू उत्तराखंडकडून खेळला होता.

परदीपने प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमात ३६९ गुण घेत या मोसमात सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला होता. तसेच एका सामन्यात सर्वाधिक गुण घेणारा तो खेळाडू ठरला होता.

आज महा स्पोर्ट्सशी बोलताना परदीपने त्याच्या नवीन संघाबद्दल सांगितले. “मी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपूर्वी सेनादलकडून खेळणे बंद केले. मी तेथील राजीनामा दिल्यामुळे मी ६५व्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तराखंड संघाकडून खेळलो. परंतु नवीन मोसमात मी हरियाणा संघाकडून खेळेल. ” असे परदीप म्हणाला.

२० वर्षीय परदीपने प्रो कबड्डीचा तिसरा, चौथा आणि पाचवा मोसम चांगलाच गाजवला होता. त्याने तिसऱ्या मोसमात १२१, चौथ्या मोसमात १३३ तर पाचव्या मोसमात ३६९ गुण घेतले आहेत.