प्रदीपला खुणावतोय एका मोसमात सर्वाधीक गुण मिळवण्याचा विक्रम

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात पहिल्या मोसम बनलेला सर्वात मोठा विक्रम मोडला जाणार आहे. प्रो कबड्डीमधील रेडर आणि त्याच्या भोवतालचे वलय हे सर्व ज्ञात आहे. प्रो कबड्डीमध्ये एका मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम अनुप कुमारच्या नावावर आहे. पहिल्या मोसमात अनुपने १६ सामने खेळताना १६९ गुण मिळवले होते. पहिल्या मोसमात दुसऱ्या क्रमांकावर होता राहुल चौधरी त्याने १६१ गुण मिळवले होते.

# दुसऱ्या मोसमात सर्व संघानी डिफेन्सिव्ह खेळाकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे या मोसमात पहिल्या मोसमाइतके गुण कोणत्या खेळाडूला कमवता आले नाहीत. काशीलिंग अडकेने दुसऱ्या मोसमात १४ सामने खेळताना सर्वाधिक ११७ गुण मिळवले होते. अनुप कुमारने आपल्या खेळात बदल केल्याने त्याला फक्त ८१ गुण मिळवता आले होते. तरी देखील त्याने यु मुंबाला दुसऱ्या मोसमाच्या विजेतेपद जिंकून दिले होते.

# तिसऱ्या मोसमात प्रदीप नरवाल डिफेन्सला न सुटणारे कोडे म्हणून उदयास आला. त्याच्या डुबकीच्या कौशल्याने त्याला यशाच्या शिखरावर नेले. त्याने या मोसमात १६ सामन्यात खेळताना १२१ गुण मिळवले होते. त्याने पटणा पायरेट्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात खूप मोठा वाटा उचलला होता. तिसऱ्या मोसमात दुसर्या क्रमांकावर होता तो यु मुंबाचा रिशांक देवाडीगा. रिशांकने ११५ गुण मिळवले होते. यु मुंबाचा संघ तिसऱ्या मोसमाच्या उपविजेता होता.

# चौथ्या मोसमात राहुल चौधरीने कमाल केली. त्याने या मोसमात १६ सामने खेळताना १५० गुण मिळवले होते. दोन मोसमात १५० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा राहुल पहिला खेळाडू ठरला. दुसऱ्या क्रमांकावर प्रदीप नरवाल होता. त्याने १६ सामने खेळताना १३३ गुण मिळवले होते. प्रदीपने सलग दुसऱ्या मोसमात १०० पेक्षा जास्त गुण मिळवताना पाटणा पायरेट्सला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले होते.

# प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडला जाणार आहे. या मोसमात प्रदीप नरवाल भन्नाट लयीत असून त्याने ११ सामन्यात १४९ गुण मिळवले आहेत. त्याने या मोसमात दोन वेळा एका सामन्यात २१ गुण मिळवले आहेत. ११ सामन्यात त्याने ८ वेळा सुपर टेन कमावला आहे. त्याने जर कामगिरी चालू ठेवली तर एका मोसमात २०० गुण मिळवणारा तो पहिला खेळाडू बनू शकेल. कारण या मोसमात प्रत्येक संघाला २२ सामने खेळावे लागणार आहेत.

# प्रदीप नरवाल याने पुढील काही सामन्यात खेळून २१ गुण मिळवले तर तो अनुप कुमारचा एका मोसमात सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडेल. त्याच बरोबर त्याने आता फक्त एक गुण मिळवला तर तो एका मोसमात १५० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा केवळ तिसरा खेळाडू बनेल.