प्रशिक्षक कोस्टांचा व्यावहारीक दृष्टिकोन मुंबईसाठी फलदायी

मुंबई, दिनांक 5 मार्च ः हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीने बाद फेरीत प्रवेश केला. एकवेळ मात्र त्यांची संधी पुन्हा हुकेल असे चित्र निर्माण झाले असताना पोर्तुगालचे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा यांचा दृष्टिकोन फलदायी ठरला.
 
कोस्टा यांनी एक सामना बाकी असताना संघाची आगेकूच नक्की केली. मुंबईला यापूर्वी एकदाच बाद फेरीत प्रवेश करता आला आहे. त्यांना अंतिम फेरीपर्यंत एकदाही मजल मारता आलेली नाही. यावेळी एफसी गोवाविरुद्ध त्यांची लढत आहे. साखळीतील दोन सामन्यांत मिळून गोव्याविरुद्ध मुंबईला सात गोल पत्करावे लागले. दुसरीकडे त्यांना एकाही गोलचे प्रत्यूत्तर देता आले नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईला अंतिम फेरी गाठण्याची संधी कितपत मिळणार असा प्रश्न निर्माण होतो. व्यावहारिक दृष्टिकोनामुळे कोस्टा यांना नक्कीच विश्वास वाटतो.
 
संपूर्ण मोसमात कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने सामन्यांविषयी व्यावहारीक दृष्टिकोनाचा अवलंब करण्याची क्षमता दाखविली आणि ती परिणामकारक पद्धतीने राबविली. मुंबईने काही मोठे विजय मिळविले, ज्यात केरळा ब्लास्टर्सवरील 6-1 असा विजयाचा समावेश होता. यानंतरही बाद फेरी गाठलेला मुंबई हा सर्वाधिक धडाकेबाज संघ ठरत नाही.
 
मुळात मुंबईने 25 गोल कले आहेत, जे पाचव्या क्रमांकावरील जमशेदपूरच्या 29 गोलांपेक्षा कमी आहेत. गोव्याच्या 36 गोलांसमोर तर हा आकडा तोकडाच पडतो. मुंबईचा पाच हा गोलफरकही फारसा उल्लेखनीय नाही.
 
यानंतरही मुंबईचा व्यावहारिक दृष्टिकोन आश्चर्यकारक पद्धतीने फलदायी ठरत असल्याचे दिसून येते. निकालास पहिले प्राधान्य अशी मानसिकता कोस्टा यांनी संघात निर्माण केली. मुंबईच्या आतापर्यंतच्या यशस्वी मोहिमेचे हेच वैशिष्ट्य ठरले आहे.
 
कोस्टा यांनी सांगितले की, सामन्याच्या अखेरीस तीन गुण मिळवून देईल अशीच शैली प्रशिक्षक या नात्याने मला महत्त्वाची वाटते.
 
आतापर्यंतचे चित्र पाहिले तर कोस्टा यांनी आपले शब्द खरे करून दाखविले आहेत. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर गोव्याविरुद्ध 0-5 असा पराभव झाल्यानंतर कोस्टा संतापले होते. सामना संपल्याची शिट्टी वाजण्यापूर्वीच आपल्या खेळाडूंनी प्रयत्न सोडून दिल्याचा आरोप त्यांनी केली. त्याचवेळी अशी कामगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. पहिल्या 20 मिनिटांत मुंबईने वर्चस्व राखल्याचा मुद्दा तेव्हा गौण ठरला होता.
 
त्या पराभवानंतर मुंबईने अक्षरशः राखेतून भरारी घेतली आणि गुणतक्त्यात प्रगती केली. मुंबईत गोव्याविरुद्ध दुसऱ्या टप्यात सामना झाला तेव्हा महत्त्वाचे खेळाडू संघात नव्हते.
 
अशावेळी उपांत्य फेरीत पारडे फिरवू शकू असा विश्वास मुंबईला कशामुळे वाटू शकेल असा प्रश्न पडतो. याच मुंबई संघाने बेंगळुरू एफसीची अपराजित मालिका खंडित करून दाखविली.
 
भक्कम बचावात्मक व्युहरचना हे कोस्टा यांच्या कार्यपद्धतीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. प्रतिआक्रमणात जोरदार आक्रमक खेळ करण्याची तेवढीच क्षमता मुंबईकडे आहे. याच धोरणाचे फळ मुंबईला यंदा काही महत्त्वाच्या सामन्यांत मिळाले, ज्यात धडाक्यातील बेंगळुरूविरुद्धच्या 1-0 अशा विजयाचा समावेश आहे.
 
अशावेळी कोस्टा यांचा हाच व्यावहारिक दृष्टिकोन गोव्याच्या धडाक्याला प्रत्यूत्तर देण्याकरीता मुंबईसाठी फलदायी ठरू शकेल.