एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या ससी कुमार मुकुंद, प्रजनेश  गुन्नेश्वरण यांचे विजय

पुण्याच्या अर्जुन कढेचे आव्हान संपुष्टात

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत  ससी कुमार मुकुंद, प्रजनेश गुन्नेश्वरण या दोन भारतीय खेळाडूंनी आपली विजयी मालिका कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत एकेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जागतिक क्र.355असलेल्या भारताच्या ससी कुमार मुकुंद याने जागतिक क्र.181असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या जे क्लार्कचा 5-7, 6-4, 4-1असा पराभव करून आगेकूच केली.

1तास 56मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 10व्या गेमपर्यंत 5-5अशी बरोबरी असताना  क्लार्कने मुकुंदची 12व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 48मिनिटात 7-5असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या मुकुंदने दुसऱ्या सेटमध्ये अधिक भक्कम सुरुवात केली.

या सेटमध्ये मुकुंदने बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 3ऱ्या व 5व्या गेममध्ये क्लार्कची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मुकुंदने वर्चस्व राखत पहिल्याच गेममध्ये क्लार्कची सर्व्हिस भेदली. त्यानंतर पाचव्या गेममध्ये पुन्हा एकदा मुकुंदने क्लार्कची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-1अशी आघाडी घेतली. यावेळी क्लार्कने दुखापतीमुळे सामन्यातुन माघार घेतली.

जागतिक क्र.189 असलेल्या कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूर याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या जागतिक क्र.370 असलेल्या अर्जुन कढेचा 7-5, 6-2असा पराभव केला.

1तास 12मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ब्रेडनने अर्जुनची 3ऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व 2-1अशी आघाडी घेतली. त्यानंतर अर्जुनने पुनरागमन करत 8व्या गेममध्ये ब्रेडनची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4अशी बरोबरी साधली. ब्रेडनच्या आक्रमक शैलीपुढे अर्जुनची खेळी निष्प्रभ ठरली.

11व्या गेममध्ये ब्रेडनने अर्जुनची पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये ब्रेडनने अर्जुनची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. या सेटमध्ये 8व्या गेममध्ये ब्रेडनने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2असा सहज जिंकून विजय मिळवला.

जागतिक क्र.110असलेल्या भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरणने जागतिक क्र.794असलेल्या जर्मनीच्या लुकास गेरचचा 6-1, 6-3असा एकतर्फी पराभव केला. तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने जर्मनीच्या डॅनियल मासूरचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(4)असा पराभव केला. अव्वल मानांकित मालदोवियाच्या राडू एल्बोटने ऑस्ट्रेलियाच्या मावरीक बेन्सचा 6-3, 6-1असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.

दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या पुरव राजाने क्रोएशियाच्या अँटोनिओ सॅन्सीकच्या साथीत जर्मनीच्या डॅनीयल मासूर व ऑस्ट्रियाच्या त्रिस्तन सॅम्युएल विसब्रोनेचा 4-6,7-6(6),10-8 असा तर, स्लोव्हाकियाच्या आंद्रेज मार्टिन व चीनच्या हंस पोडलीपनीक-कॅस्टिलो यांनी यूएसएच्या कोलिन अल्तामिरानो व ऑस्ट्रेलियाच्या मावरीक बेन्स यांचा 6-4,7-5असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी):

ससी कुमार मुकुंद(भारत)वि.वि.जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन)(6) 5-7, 6-4, 4-1सामना सोडून दिला;

ब्रेडन चेन्यूर(कॅनडा)वि.वि.अर्जुन कढे(भारत)7-5, 6-2;

प्रजनेश गुन्नेश्वरण(भारत)(4)वि.वि.लुकास गेरच(जर्मनी)6-1,6-3;

इलियास यमेर(स्वीडन)(3)वि.वि.डॅनियल मासूर(जर्मनी)6-3, 7-6(4)

राडू एल्बोट(मालदोविया)(1)वि.वि.मावरीक बेन्स(ऑस्ट्रेलिया)6-3, 6-1;

फ्रेडरिको फरेरा सिल्वा(पोर्तुगल)वि.वि.निकोला कुहन(स्पेन)7-5, 7-5;

अलेक्झांडर नेदोव्हेसोव्ह(कझाकस्तान)वि.वि. बेन पेटल(इस्राईल)7-5, 6-4;

सेबस्तियन फॅसिलव(जर्मनी)वि.वि.मॅक्स पुरसेल(ऑस्ट्रेलिया)6-2, 6-1;

 

दुहेरी गट: पहिली फेरी: 

पुरव राजा(भारत)/अँटोनिओ सॅन्सीक(क्रोएशिया)

[1] वि.वि.डॅनीयल मासूर(जर्मनी)/त्रिस्तन सॅम्युएल विसब्रोने(ऑस्ट्रिया)4-6,7-6(6),10-8;

आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया)/हंस पोडलीपनीक-कॅस्टिलो(चीन)वि.वि.कोलिन अल्तामिरानो(यूएसए)/मावरीक बेन्स(ऑस्ट्रेलिया) 64 75

मॅक्स पुरसेल(ऑस्ट्रेलिया)/लूक सेव्हिल(ऑस्ट्रेलिया)वि.वि.सेम इकेल(टर्की)/डॅनिलो पेट्रोविक(सर्बिया)6-4,1-6,16-14