प्रताप मंडळ कबड्डी स्पर्धेत सिद्धीप्रभाकडून विहंग संघाचा धुव्वा

सिद्धीप्रभा, विकास, आदर्श यांनी प्रताप क्रीडा मंडळ आयोजित द्वितीय श्रेणी “स्व. सौ. गीताश्री गणेश चव्हाण” चषकाच्या कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबईतील प्रभादेवी येथील स्व. राजाराम साळवी क्रीडांगणात आजपासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात सिद्धीप्रभाने विहंगचा ४६-१६असा धुव्वा उडविला.

पहिल्या डावातच दोन लोण देत सिद्धीप्रभाने २३-०६अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात देखील त्याच जोमाने खेळ करीत सामना सहज खिशात टाकला. विवेक मोरे, प्रमोद यादव यांच्या झंजावाती चढाया, तर मिलिंद पवार यांच्या उत्कृष्ट पकडीला या विजयाचे सारे श्रेय जाते. विहंगचा सौरभ गुरव बरा खेळला.

विकासने दिलखूषला २३-१६असे नमविलें. अत्यंत चुरशीनें खेळला गेलेल्या या सामन्यात विश्रांतीला ११-०९अशी नाममात्र आघाडी विकासकडे होती. पहिल्या डावात ३अव्वल पकड करीत दिलखूष संघाने होणारा लोण टाळला.पण दुसऱ्या डावात झटपट लोण देत विकासने आपली आघाडी वाढवीत सामना आपल्या बाजूने झुकविला.

मंगेश पवार, हरकेश सिंग विकास कडून तर श्रेयस राऊळ, केसरकर दिलखूष कडुन उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात आदर्शने यंग भारतला ४२-१६ असे सहज नमविलें. मुकुंद कदम, राजेश राणे यांचा चढाई-पकडीचा उत्तम खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. यंग भारताच्या संतोष भारती, समीर परब यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिकार झाला नाही.

या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले.