४७ वर्षीय भारतीय खेळाडूने हॅट्रिक घेत केला विश्वविक्रम

दुबईमध्ये सुरु असलेल्या टी10 लीग स्पर्धेत गुरुवारी(22 नोव्हेंबर) भारताचा 47 वर्षीय गोलंदाज प्रवीण तांबेने अफलातून गोलंदाजी करत पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यात त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे. तसेच त्याने ही जबरदस्त कामगिरी करताना खास विश्वविक्रमही केला आहे.

त्याने ही कामगिरी सिंधीज संघाकडून खेळताना केरला नाइट्स विरुद्धच्या सामन्यात केली आहे. त्याच्या ही कामगिरी सिंधीज संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या सामन्यात सिंधीजने 9 विकेट्सने सहज विजय मिळवला आहे.

तांबे हा टी10 क्रिकेटमध्ये एका सामन्यात 5 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच टी10 लीग स्पर्धेत हॅट्रिक घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरला नाइट्स संघाविरुद्ध पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला बाद केले. त्याच षटकात त्याने चौथ्या, पाचव्या आणि शेवटच्या चेंडूवर अनुक्रमे इयान मॉर्गन, किरॉन पोलार्ड आणि फॅबिएन अॅलेनला बाद करत हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली. हे चारही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

एकाच षटकात 4 विकेट्स गमावल्याने केरलाची स्थिती 4 बाद 6 धावा अशी बिकट झाली. यानंतरही तांबेने त्याच्या दुसऱ्या षटकात उपुल थरंगाला बाद करत केरलाला पाचवा धक्का दिला.  त्यामुळे त्याने या सामन्यात 2 षटकात एकूण 15 धावा देत 5 विकेट्स मिळवल्या.

तांबेने घेतलेल्या या विकेट्सनंतर मात्र वेन पार्नेलने केरलाचा डाव सांभाळताना सोहेल तन्वीरला(23) साथीला घेत सातव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याला टॉम करननेही(7*) चांगली साथ दिली.

करन आणि पार्नेलने आठव्या विकेटसाठी 33 धावांची नाबाद भागीदारी रचली. त्यामुळे केरलाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 103 अशी समाधान कारक धावसंख्या उभारली. यामध्ये पार्नेलने 24 चेंडूत केलेल्या नाबाद 59 धावांचा मोठा वाटा होता.

केरलाने दिलेल्या 104 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिंधीज संघाकडून शेन वॉटसन आणि अँटॉन डेवरिचने सलामीला 80 धावांची भागीदारी रचत सिंधीज संघाला विजयाच्या समीप पोहचवले.

अँटॉन 49 धावांवर असताना बाद झाल्यावर वॉटसनने समीउल्लाह शेनवारीला(3) साथीला घेत सिंधीज संघाला सहज विजय मिळवून दिला. वॉटसनने या सामन्यात नाबाद 50 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात

भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया: दुसरा टी20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द

टाॅस का बाॅस- जो रुटचा टाॅस जिंकण्यात अजब कारनामा