Preview: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कायम ठेवेल का??

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हा ब गटातील संघ आहे .या गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा समावेश आहे. क्रिकेट विश्वात मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हा डिफेण्डिंग चॅम्पियन म्हणून भाग घेईल.

भारताच्या सलामी फलंदाजीची जबाबदारी शिखर धवन व रोहित शर्मा यांच्यावर राहील. या दोन फलंदाजांची भारतातील गेल्या काही वर्षातील कामगिरी चांगली असली तरी भारताबाहेरील कामगिरी निराशजनकच म्हणावी लागेल. उसळत्या खेळपट्यांवर हि सलामी जोडी कशाप्रकारे आपला खेळ दाखवते हे बघावं लागेल. भारताच्या गटात असणाऱ्या दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांची गोलंदाजी हि उत्तम आहे. त्यांचा सामना हे फलंदाज कसे करतील हे पहाणे मोठे औत्सुक्याचे ठरेल. या दोन फांदाजांमध्ये कुणी दुखापतग्रस्त झाला तरच मुंबईकर रहाणेला संधी मिळू शकते. रहाणेने परदेशी भूमीवर नेहमीच उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.

 
मध्यक्रमातील भारताची फलंदाजीची मदार कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम एस धोनी, अष्टपैलू युवराज सिंग, महाराष्ट्राचा स्टार अष्टपैलू केदार जाधव व मनिष पांडे यांच्यावर राहील. केदार जाधव आणि मनीष पांडे यांमधील कोणत्या खेळाडूला संधी कर्णधार विराट कोहली देतो हे धावपट्टी आणि एकूण तेव्हाची परिस्थितीच ठरवेल.

भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा ह्या दोन फिरकीपटू असेल त्यांना साथ मध्यमगती गोलंदाज आणि अष्टपैलू हार्दिक पंड्यावर असेल.

वेगवान गोलंदाजीची मदार भुवनेशवर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यावर राहील. सध्या भारताचे हे चारही वेगवान गोलंदाज जबदस्त लयीत आहेत.

भारताला ह्या मिनी वर्ल्ड कपचे जेतेपद राखायचे असेल तर फलंदाजी व गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर सर्वोत्कृष्ट कामगिरीची गरज आहे. विराट कोहली ,धोनी ,युवराज यांना आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये भुवी, शमी व उमेश यादव तसेच हानामारीच्या षटकांत जसप्रीत बुमराहची गोलंदाजी यांचे मिश्रण पाहण्यायोग्य राहील.

जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उत्सुक आहेत. भारताचे या स्पर्धेतील अभियान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध ४ जून ला सुरु होईल. आशा आहे की भारत ह्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून विजेतेपद कायम ठेवेल.