नेपाळ विरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीसाठी भारत सज्ज

भारत आणि नेपाळमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलमधील मुंबई फुटबॉल अरेना येथे होत आहे. ए.एफ.सी एशीयन कपच्या दुसऱ्या पात्रता सामन्याअगोदर सरावासाठी याचे आयोजन केले आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे.
भारताचा एशियन कपचा पुढील सामना १३ जूनला किर्गिझस्थान सोबत खेळणार आहे. किर्गिझस्थान देखील एक सामना जिंकून भारताच्या बरोबरीने गटात पहिल्या स्थानावर आहे. १३ तारखेलाच नेपाळ संघाचा सामना येमेन सोबत असणार आहे. गटात पहिल्या दोन स्थानावर असणारे संघ एशियन कपसाठी पात्र ठरतील.

भारताने या सामन्यासाठी संघ निवड केली नसली तरी भारतीय फुटबॉल स्टार कर्णधार सुनील छेत्रीला या सामन्यात विश्रांती दिली जाणार आहे. जेजेलाल पेख्लुआ, जॅकीचेन सिंग, संदेश झिंगन, गोलकिपर म्हणून गुरीप्रीत सिंग संघात असण्याची शक्यता आहे. भारतीय कोच स्टेफेन कॉन्स्टन्टाईन सामन्या अगोदर काही नवीन खेळाडूंना संधीही देऊ शकतात.

फिफाच्या क्रमवारीत १०० व्या स्थानावर असणाऱ्या भारताने मागील १३ सामन्यात ११ विजय मिळवले आहेत तर मागील ५ सामन्यात सलग विजय मिळवले आहेत. आपले शेजारी राष्ट्र नेपाळ विरुध्द भारत गेल्या १८ वर्षात एकही सामना हरला नाही. नेपाळने मागील ५ सामन्यात फक्त १ विजय मिळवला आहे.

जेव्हा गेल्या वेळी साफ चषकाच्या सामन्यात हे दोन संघ एकमेकांविरूध्द आले होते तो सामना भारताने ४-१ असा जिंकला होता. नेपाळचा संघ हा खूप तरुण संघ असून नवीन जपानी कोच कोजी ग्योटोकु यांच्या मार्गदर्शनाखली चांगली कामगिरी करू शकतो तर भारतीय संघ आक्रमण आणि अनूभवाच्या जोरावर सामन्यात जबदस्त कामगिरी करू शकतो.