Preview: भारत विरुद्ध पाकिस्तान

आयसीसीने आयोजित केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत पाकिस्तान मागच्या वेळी जेव्हा अंतिम सामना खेळला होता त्यावेळी विराट कोहली अवघ्या दहा वर्षाचा होता.त्याच विराट कोहलीच्या भारतीय संघांबरोबर आता पाकिस्तान २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रविवारी ओव्हलच्या मैदानावर लढणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाकिस्तानची सुरूवात तशी निराशाजनकच झाली.पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा तब्बल १२४ धावांनी धुव्वा ऊडवला.या लाजिरवाण्या पराभवानंतरही पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकेल असे कोणाला वाटले सुद्धा नव्हते. खुद्द पाकिस्तानी चाहत्यांनासुद्धा.पण स्पर्धेच्या दुसर्‍या आठवड्यात जे चित्र समोर आले त्याने भल्या भल्या क्रिकेट जाणकारांना तोंडात बोटे घालायला लावली.कारण पाकिस्तानने उपांत्यफेरीत बलाढ्य इंग्लंड संघाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

पाकिस्तानला अंतिम सामन्यात पुन्हां एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रबळ दावेदार गतविजेत्या भारतीय संघांबरोबर दोन हात करावे लागणार आहेत.तर स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे.

बेभरवशी पाकिस्तानी संघांकडून तसे कोणाच्याच विशेष काही अपेक्षा नव्हत्या. पण मोक्याच्या वेळी खेळात कमालीची सुधारणा करत दक्षिण अफ्रीका, श्रीलंका व उपांत्यफेरीत यजमान इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली.

रविवारी होणारा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना म्हणजे भारतीय फलंदाज व पाकिस्तानी गोलंदाज यांमधील युद्धंच म्हणावे लागेल. मागील काळात भारताने सातत्याने जरी पाकिस्तानवर वर्चस्व राखले असले तरी यावेळी त्यांच्या कामगिरीचा विचार करता गाफिल राहून चालणार नाही.

भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी जी दमदार कामगिरी केली आहे त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना अजून संधीच मिळाली नाही.जर भारताला अतिंम सामना जिंकायचा असेल तर आघाडीच्या फलंदाजांबरोबर मधल्या फळीतील फलंदाजांनाही मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करावी लागेल.