सचिन, लारानंतर आता पृथ्वी शॉ खेळणार एमआरएफच्या बॅटने !

मुंबई । मुंबईकर प्रतिभावान क्रिकेटपटू पृथ्वी शॉ एमआरएफशी करारबद्ध झाला आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलँड देशात होत असलेल्या अंडर १९ विश्वचषकात त्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे.

भारताच्या या गुणवान खेळाडूला यापुढे बॅटचे प्रायोजक म्हणून एमआरएफने करारबद्ध केले आहे. शॉने आपल्या चांगल्या कामगिरीने अनेक आजी माजी खेळाडूंचे लक्ष वेधले आहे.

देशांतगर्त क्रिकेटमध्ये या मोसमात अतिशय सातत्यपूर्ण खेळाने शॉने देशाचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या रणजी मोसमात ४८.८१च्या सरासरीने ६ सामन्यात ५३७ धावा केल्या आहेत.

यापूर्वी एमआरएफने क्रिकेटमधील दिग्गज समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर, स्टिव्ह वॉ आणि ब्रायन लाराला करारबद्ध केले होते.

भारतीय संघाला अंडर १९ विश्वचषकात राहुल द्रविडचे मार्गदर्शन मिळणार आहे.

याबद्दल बोलताना शॉ म्हणाला, ” मला खूप आनंद होतोय की लवकरच एमआरएफच्या बॅटने खेळणार आहे. मी माझ्या प्रेरणास्थान असणाऱ्या सचिन. लारा आणि कोहलीला या बॅटने खेळताना पाहिले आहे. “

सचिन तेंडुलकर, स्टिव्ह वॉ आणि ब्रायन लाराबरोबर रोहित शर्मा, गौतम गंभीर, संजू सॅम्सन, शिखर धवन, एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली ह्या बॅटने खेळताना दिसले आहेत.