चांगली कामगिरी करूनही पृथ्वी शॉवर झाला मोठा अन्याय

काल आयसीसीने १९ वर्षाखालील खेळाडूंचा विश्वचषक ११ संघ घोषित केला. यात भारतीय संघातील पृथ्वी शॉसह ४ अन्य खेळाडूंना स्थान देण्यात आले.

असे करताना या संघाचा कर्णधार म्हणून मात्र आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचा रेनार्डवान टोंडरचे नाव घोषित केले. रेनार्डवान टोंडर या स्पर्धेत ६ सामन्यात ३४८ धावा करताना १४३ धावांची झिम्बाब्वे विरुद्ध मोठी खेळी केली.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हा संघ या स्पर्धेत ५व्या स्थानावर राहिला.

दुसऱ्या बाजूला कर्णधार पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने मात्र सर्वच सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाना मोठ्या फरकाने धूळ चारली. विशेष म्हणजे या विजयात पृथ्वी शॉनेही चांगली कामगिरी केली आहे.

शॉने ६ सामन्यात २६१ धावा करताना संघाला विजेतेपद जिंकून दिले. असे असताना मग ह्या संघाची निवड करताना ५ दिग्गजांच्या पॅनलने कोणते नियम लावले हे मात्र समजू शकले नाही. आयसीसीने दिलेल्या प्रसिद्धी प्रत्रकात त्याच्याकडे असलेल्या कौशल्यांमुळे कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

साधारणतः विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व निवडताना अंतिम सामन्यात गेलेल्या आणि चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंकडे दिले जाते. असे असताना मग या संघाचे नेतृत्व दुसऱ्या खेळाडूकडे का? भलेही तो खेळाडू स्पर्धेत चांगला खेळला असेल तर पण एक कर्णधार म्हणून त्याची कामगिरी काय?

हा संघ ५ सदस्यांच्या पॅनलने निवडला असून त्यात वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाजइयान बिशप, भारताची माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा, न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रोव, पत्रकार शशांक किशोर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी महान कर्णधार टॉम मूडी यांचा समावेश होता.