पृथ्वी शॉचे मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम !

ओडिसा विरुद्ध मुंबई संघातील रणजी सामन्यात मुंबईचा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉने आज १०५ धावांची शतकी खेळी करताना रणजी स्पर्धेत १८ वर्षांपेक्षा कमी वयात सर्वात जास्त शतक करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

सचिनने १८ वर्षांपेक्षा कमी वयात रणजी स्पर्धेत २ शतके केली आहेत. तर पृथ्वीने आज त्याचे रणजी स्पर्धेतील तिसरे शतक करून त्याने आंबती रायडू आणि अंकित बावणे यांच्या ३ शतकांची बरोबरी केली आहे. पृथ्वी सध्या १७ वर्ष ३५७ दिवसांचा आहे. त्यामुळे जर मुंबईला सामन्यातील दुसरा डाव खेळायला मिळाल्यास त्याला या यादीत अव्वल येण्याची संधी आहे.

याबरोबरच आजचे शतक पृथ्वीचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचव्या सामन्यातील चौथे शतक आहे. त्यामुळे आता त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयात सर्वात जास्त शतक करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आंबती रायडूची बरोबरी केली आहे. या दोघांचीही प्रत्येकी ४ शतके आहेत. या यादीत अजूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७ शतकांसह अव्वल स्थानी आहे.

आजच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २६४ धावा केल्या आहेत. या सामन्यात पृथ्वीचे शतक आणि अजिंक्य रहाणेने त्याला दिलेली साथ सोडली तर बाकीच्या फलंदाजांना काही करता आले नाही. भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने सुरुवात चांगली केली होती परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही त्याने ४९ धावा केल्या. सध्या मुंबई संघाचा कर्णधार आदित्य तारे आणि आकाश पारकर खेळत आहेत.