प्रो कबड्डी: पुणे लेगची ड्रीम टीम

प्रो कबड्डीमधील शेवटचा लेग संपला आहे. पुणे लेगमध्ये झोन ए मध्ये पहिल्या क्रमांकासाठी झुंज पाहायला मिळाली तर झोन बी मध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची चढाओढ सुरु होती. पुणे लेगमध्ये घरेलू संघ पुणेरी पलटण यांची कामगिरी समाधानकारक राहिली. पुणेरी संघाने खेळलेल्या ६ सामन्यात ३सामने जिंकले तर ३ सामन्यात पराभव पत्करला.

या लेगमध्ये काही खेळाडूंनी सातत्याने उत्तम कामगिरी केली तर काही खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली. पुणे लेग आपल्या कामगिरीच्या जोरावर गाजवणाऱ्या खेळाडूंचा हा संघ बनवण्याचा केलेला प्रयन्त.

#१ सुरजीत सिंग – (राईट कॉर्नर)

बेंगाल वॉरियर्सचा कर्णधार सुरजीत याने पुणेमध्ये खेळलेल्या दोन्ही सामन्यात हाय ५ मिळवला आहे. तो जरी कव्हर म्हणून खेळत असला तरी त्याच्या कामगिरीतील सातत्य बेंगालच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका बजावते आहे. तो या मोसमात बेस्ट डिफेंडर्सच्या यादीत ७३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने कालच्या सामन्यात राहुल चौधरीला पूर्णपणे जखडून ठेवले आणि वेळोवेळी बाद देखील केले. 

#२ अजय ठाकूर -(राईट इन )

अजयने पुणे लेगमधील दोन्ही सामन्यात सुपर टेन लगावला. त्यासोबतच त्याने सलग६ सामन्यात सुपर १० करण्याचा पराक्रम केला. शेवटच्या सामन्यात अजयच्या सुपर टेनच्या जोरावर तमिल थलाईवाजने पटणाला हरवण्याची कामगिरी केली आणि या स्पर्धेचा शेवट गोड केला. जबरदस्त खेळाच्या जोरावर अजय हा केवळ दुसरा रेडर ठरला होता ज्याने २००गुणाचा टप्पा पार केला.

#३ सुनील कुमार – (राईट कव्हर)

सुनील कुमार हा खेळाडू गुजरातच्या डिफेन्समधील महत्त्वाचा खेळाडू आहे. फझल अत्राचली, अबोजार मिघानी आणि परवेश बन्सल या खेळाडूंच्या छायेत दिसला. परंतु पुणे लेगमध्ये त्याने स्वतःचा खेळ उंचावला. त्याने पुणे लेगमध्ये खेळलेल्या पुणेरी पलटण विरुद्धच्या दोन्ही सामन्यात हाय ५ मिळवत १४ डिफेन्स गुणांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर गुजरात फॉरचून जायन्टस संघ झोनमध्ये पहिल्या स्थानी पोहोचलाच त्याच बरोबर सुनील कुमारने ५० टॅकल गुणांची कमाई देखील केली. अशी कामगिरी करणारा तो गुजरात संघातील ३ डिफेंडर पैकी एक बनला आहे.

#४ रोहित कुमार – (सेन्टर )

रोहितने पुणे लेगमध्ये विक्रमी ३० रेडींग गुण मिळवताच त्याचे या संघात स्थान निश्चित झाले होते. त्याने युपी योद्धा विरुद्धच्या सामन्यात ३२ रेडींग गुण मिळवत एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला.

रोहितने पुणे लेगमध्ये खेळल्या ३ सामन्यात एकुन ५१ रेडींग गुण कमावले. रोहितने या मोसमात १२ सुपर टेन करून आपण खूप मोठे खेळाडू आहोत हे पुन्हा दाखवून दिले आहे. फक्त प्रदीप नरवालने त्याच्यापेक्षा जास्त सुपर टेन आणि एकूण गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर २०० रेडींग गुण मिळवणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.

#५ महेंदर सिंग -(लेफ्ट कव्हर )

महेंदर सिंग याने युपी योद्धा विरुद्धच्या सामन्यात १० टॅकल गुण मिळवले. अशी कामगिरी करत एका सामन्यात सर्वाधिक टॅकल गुण मिळवण्याचा विक्रम संयुक्तरित्या त्याच्या नावावर जोडला गेला. जरी बेंगलुरु बुल्स संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले असले तरी या खेळाडूने उत्तम कामगिरीच्या जोरावर सर्वांना आकर्षित केले आहे.

#६ दीपक निवास हुड्डा- ( लेफ्ट इन )

दीपकने पुणे लेगमध्ये खेळल्या ६ सामन्यात ४७ गुणांची कमाई केली आहे. त्यात त्याने ३ सुपर टेन लगावले. दीपकने या मोसमात १५४ रेडींग गुण मिळवले आहेत. तो पुणेरी पलटणला त्यांच्या पहिल्यावहिल्या अंतिम फेरीत घेऊन जातो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

#७ रिंकू नरवाल-

पुणेरी पलटणचा मुख्य लेफ्ट कॉर्नर गिरीष एर्नेक याला अराम दिल्यानंतर रिंकूला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याने उत्तम कामगिरी करत नियमित संघात स्थान बनवले. तो पुण्याचा पुणे लेगमधील सर्वोत्तम डिफेंडर ठरला. त्याच्या सहभागानंतर पुण्याचे लेफ्ट कॉर्नरसाठीचे खूप मोठे कोडे सुटले आहे. आता गिरीषला त्याच्या आवडत्या लेफ्ट कव्हर जागेवर खेळण्याची मुभा मिळणार आहे.