प्रो कबड्डी: बेंगळुरू बुल्सला नागपूरचा सहारा! या मोसमासाठी नागपूर ‘होम ग्राउंड’

पर्व सुरू होण्यास अवघे ८-९ दिवस राहिले असता ‘बेंगळुरू बुल्स’च्या फॅन्ससाठी एक निराशा करणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ‘बेंगळुरू बुल्स’ आपले सामने घरच्या मैदानावर खेळू शकणार नाही!

बेंगळुरू बुल्स दरवर्षी आपले घरचे सामने हे ‘कांतीर्व मैदान, बेंगळुरू’ येथे खेळत असते. यंदाही त्यांचे सामने तेथेच आयोजित केलेले होते. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या प्रो कबड्डीच्या वेळापत्रकातही तसाच उल्लेख होता!

मात्र आजच ‘बेंगुळुरू बुल्स’च्या ट्विटर अकाउंटवरून बेंगळुरू स्टेडियम उपलब्ध नसल्याने संघाचे घरचे सामने तिथे होणार नाहीत असे जाहीर करण्यात आले.

या बातमीमुळे निश्चितच बेंगळुरूचे कबड्डी रसिक नाराज झाले असतील आणि पण आता त्यांच्या संघाला घरी बसून पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही!

नागपूरकरांसाठी मात्र ही आनंदाची बातमी आहे कारण बेंगळुरू संघाचे सर्व घरचे सामने आता नागपुरात खेळवले जातील असे जाहीर करण्यात आलेले आहे.
नागपूरकरांना आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नागपूरकर खूश असतील यात शंका नाही.

आपल्या संघाला नागपुरकरांचा पूर्ण पाठिंबा मिळावा अशीच इच्छा ‘बेंगळुरू बुल्स’ संघ करत असेल. असे असले तरी नागपूरकर ‘पुणेरी पलटण’ आणि ‘यू मुम्बा’ या महाराष्ट्राच्या संघांनाच पाठिंबा देण्याची जास्त शक्यता आहे! पुणे,मुंबई पाठोपाठ नागपूर हे प्रो कबड्डी सामन्यांचे आयोजन करणारे महाराष्ट्रातले ३रे शहर आहे! महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जेथे ३ शहरांमध्ये प्रो कबड्डीचे आयोजन करण्यात येत आहे!

म्हणून यंदा खऱ्या अर्थाने ‘आपलंच राज्य आहे’!!

-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )