प्रो कबड्डी: आज दबंग दिल्ली आणि पिंक पँथरमध्ये आमने सामने

प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमात आज दुसऱ्या दिवशी सामना होणार आहे दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पँथर संघामध्ये. जयपूरचा संघ हा पहिल्या मोसमात विजेता संघ तर मागील चौथ्या मोसमात उपविजेता. दबंग दिल्लीचा संघ सेमी फायनलमधेच येण्यासाठी आजपर्यंत झगडतो आहे. या नवीन मोसमात दबंग दिल्ली दबंग होईल कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जयपूरचा संघ या मोसमात विजेते पदाचा प्रबळ दावेदार आहे. जयपूर संघाकडे प्रो कबडीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी डिफेंडर आणि ऑल राउंडर असणारा मंजीत चिल्लर आहे, जो या वर्षी संघाचा कर्णधारही असणार आहे. जसवीर सिंग नेहमीप्रमाणे जयपूरचा मुख्य रेडरची भूमिका बजावेल तर संघाने विकत घेतलेला गुणी रेडर के. सिल्वामानी हा डू ऑर डाय रेडरची भूमिका बजावेल. संघाकडे उत्तम डिफेंडरही आहेत.

दबंग दिल्लीचा संघ हा रेडींगच्या बाबतीत प्रामुख्याने रवी दलाल या खेळाडूवर अवलंबून असणारा आहे. डिफेन्समध्ये संघ थोडा मजबूत भासत आहे. दिल्लीकडे निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे हे उत्तम राइट कॉर्नर आणि राइट कव्हरची जोडी आहे. दिल्लीचा कर्णधार मिराज शेख रेडींग आणि डिफेन्स दोन्हीमध्ये संघासाठी उत्तम कामगिरी करू शकतो.

आजच्या सामन्यात जयपूचे पारडे थोडे जड असेल कारण खेळाच्या साऱ्या पातळ्यांवर हा संघ मजबूत भासत आहे.