प्रो कबड्डी: २९० सामन्यांचा इतिहास असणाऱ्या प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली

प्रो कबड्डीमध्ये आपण आपल्या आवडत्या संघाला सामना जिंकताना तर कधी गमावताना देखील पहिले आहे. कधी आपल्या आवडत्या संघाचा सामना बरोबरीत सुटताना देखील आपण पाहिला असेल. पण काल प्रो कबड्डीमध्ये सामना होऊ शकला नाही. कालचे दोन्ही साने रद्द करण्यात आले.

प्रो कबड्डीचा मुक्काम सध्या मुंबई नगरीत आहे. मुंबईमध्ये काल सकाळपासूनच पावसाने जोर पकडला होता. दिवसभर झालेल्या पावसाने मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. त्यामुळे मुंबई येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्याचा फटका प्रो कबड्डी स्पर्धेला देखील बसला.

काल प्रो कबड्डीमध्ये दोन सामने होणार होते. पहिला सामना बेंगलूरु बुल्स वि. यु.पी.योद्धा तर दुसरा सामना यु मुंबा वि. गुजरात फॉरचून या संघामध्ये होता. हे सामने खेळण्यासाठी हे संघ पावसामुळे आणि वाहतुकीच्या अन्य समस्यांमुळे सामन्याच्या ठिकाणी पोहचू शकत नव्हते. त्यामुळे हे सामने रद्द करण्यात आले.

सामने रद्द होण्याची प्रो कबड्डी स्पर्धेतील ही पहिलीच वेळ आहे. मागील चारही मोसमात प्रो कबड्डीमधील कोणताही सामना रद्द करण्यात आला नव्हता. हे रद्द झालेले सामने पुन्हा होणार आहेत असे संयोजकांनी घोषित केले आहे.

मागील चार मोसमामध्ये प्रत्येकी ६० सामने खेळवले गेले तर या मोसमात ५० सामने खेळवले गेले आहेत. एकूण २९० सामन्यानंतर प्रो कबड्डीमधील एखादा सामना रद्द झाला.