प्रो कबड्डी- बेंगलूरु बुल्सचा रोहित कुमार कर्णधार तर उपकर्णधार रविंदर पहल

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात ५ बेंगलूरु बुल्स संघाने त्यांच्या कर्णधार आणि उप कर्णधारांची नावे घोषित केली. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात सर्वात मौल्यवान खेळाडू ठरलेला रोहित कुमार या मोसमात  बेंगलूरु बुल्सचा कर्णधार असणार आहे तर उपकर्णधार म्हणून सीजन ३मध्ये बेस्ट डिफेंडर असणारा रविंदर पहल असणार आहे.

रोहित कुमार याला ‘भारतीय कबड्डीचे भविष्य’ जाणकार मानतात. त्याला संघात घेण्यासाठी बेंगलूरु  बुल्सने या मोसमातील दुसरी सर्वाधिक रक्कम ८१ लाख रुपये दिली आहे. सर्व्हिसेसच्या या गुणी खेळाडूने प्रो कबड्डीमध्ये खेळताना २६ सामन्यात २०५ गुण  मिळवले आहेत तर त्यातील १९५  गुण त्याने रेडींगमध्ये कमावले आहेत तर १४ गुण  त्याने डिफेन्स मध्ये कमावले आहेत.

अँकल होल्ड साठी प्रसिद्ध असणारा रविंदर पहल याला बेंगलूरु बुल्स संघाने उपकर्णधार केले आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये ४८ सामन्यात १६४ गुण  मिळवले असून त्यातील १५२गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले आहेत तर १२ गुण त्याने रेडींग मधून कमावले आहेत.

बेंगलूरु बुल्सचा पहिला सामना ३० जुलै रोजी तेलगू टायटन्स संघाबरोबर हैद्राबाद येथे होणार आहे.