टॉप ५: प्रो कबड्डीमध्ये या रेडर्सने केला एका सामन्यात २० गुणांचा टपा पार

प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा आतापर्यंतचा प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि उत्साहाने भरलेला मोसम ठरला आहे. हा मोसम ३ महिन्यांचा होता, ज्यात ४ नवीन संघाचे आगमन झाले होते. या नवीन संघामधील गुजरातच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली.

४ नवीन संघाच्या आगमनामुळे कोणत्याच संघाचा डिफेन्स परिपूर्ण नव्हता. काही संघाचा राईट कॉर्नर चांगला होता तर काही संघाचा लेफ्ट कॉर्नर. तर प्रत्येक संघामध्ये एकतरी असा रेडर होता जो की समोरच्या संघाचा डिफेन्समधून गुण चोरून आणू शकतो.

कबड्डीमध्ये डेफन्समध्ये ५ गुण मिळवले तर डिफेंडरने हाय ५ केले असे म्हटले जाते. तर एखाद्या रेडरने रेडमध्ये १० गुण मिळवले तर त्याला सुपर १० म्हटले जाते. पण या वर्षी कोणत्याच संघाचा डिफेन्स परिपूर्ण नसल्यामुळे रेडर्सची चांदी झाली आणि हा मोसम खऱ्या अर्थाने रेडर्सचा ठरला.

बऱ्याच रेडर्सने समोरील संघाच्या कमकुवत डिफेन्सचा फायदा घेत झटपट आणि भरपूर गुण मिळवले आणि सुपर १०च्या ही पुढे जाऊन २० गुण मिळवले. पाहुयात कोण आहेत ते रेडर्स.

४. अजय ठाकूर (तामिल थलाईवा)

विश्वचषक विजेत्या संघाचा स्टार रेडर जरी प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या सुरुवातीला आपल्या खऱ्या लयमध्ये दिसला नसला तरी त्याने शेवटच्या काही सामन्यात तामिल थलाईवाकडून या अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या ५ सामन्यात त्याने सलग ५ सुपर १० केले आणि पाचव्या मोसमाचा शेवट गोड केला.

तेलगू टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तर त्याने एका सामन्यात २० रेड गुण मिळवले आणि तेलगूच्या डिफेन्सला सळो की पळो करून सोडले. त्याने मिळवलेल्या २० गुणांपैकी १२ टच गुण होते तर ८ बोनस गुण होते.

३. रिशांक देवाडिगा (यूपी योद्धाज)

एका सामन्यात सर्वाधिक रेड गुण मिळवण्याचा विक्रम रिशांकने आपल्या नावे केला तो म्हणजे जयपूर पिंक पँथर्स विरुद्धच्या सामन्यात. जयपूरचा संघ हा आपल्या अनुभवी खेळाडूंशिवाय खेळत होता. याचाच फायदा घेत रिशांकने या सामन्यात २८ गुण मिळवले, ज्यातील २३ टच गुण होते, तर ५ गुण बोनसचे होते. विशेष म्हणजे रिशांक या सामन्यात यूपी संघाचा कर्णधार होता. या संपूर्ण सामन्यात रिशांक फक्त एकदा बाद झाला.

२. रोहित कुमार (बंगळुरू बुल्स)

रिशांक देवाडिगाने एका सामन्यात सर्वाधिक गुणांचा विक्रम आपल्या नावे केल्यानंतर लगेचच ५ दिवसानी बंगळुरू बुल्सच्या कर्णधार रोहित कुमारने हा विक्रम मोडला. रोहितने यूपीच्याच संघाविरुद्ध ही कामगिरी केली. रोहितने या सामन्यात ३० गुण मिळवले. त्यामुळेच बंगळुरूचा संघ ४०च्या विक्रमी फरकाने हा सामना जिंकू शकला. एका सामन्यात रेडींगमधून ३व गुण मिळवणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.

रोहित कुमार सोडून बाकी रेडरने या सामन्यात बंगळुरूकडून फक्त ७ गुण मिळवले. या संपूर्ण सामन्यात यूपीच्या डिफेन्सला फक्त ४ गुण मिळाले होते.

१. प्रदीप नरवाल (पटना पायरेट्स)

प्रो कबड्डीचे विक्रम आणि प्रदीप नरवाल हे या मोसमातील एक अतूट नाते बनले आहे. या मोसमात जे काही विक्रम एक रेडर करू शकतो ते सर्व विक्रम प्रदीपने आपल्या नावे केले आहे. मग ते एका मोसमातील सर्वाधिक रेड गुण असो वा एका रेडमधील सर्वाधिक गुण असो. प्रदीप नरवालने सगळीकडेच आपली छाप सोडली आहे.

एवढे करून सुद्धा प्रदीप आपल्या संघाला झोनमध्ये पहिल्या क्रमांकावर नेऊ शकला नाही. पण त्याची कसर त्याने एलिमिनटरमध्ये भरून काढली. पहिल्याच एलिमिनटर सामन्यात त्याने या मोसमातील सर्वोत्तम डिफेन्स असेलला संघ म्हणजेच हरियाणा स्टीलर्स संघाला संपूर्णपणे नेस्तानाभूत केले.

त्याने या सामन्यात एकूण ३४ गुण मिळवले. याच सामन्यात त्याने एका रेडमध्ये ६ गुण मिळवले. विशेष म्हणजे या डिफेन्समध्ये मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा सारखे दिगज्ज डेफन्डेर होते. पण त्याला त्याचा काही फरक पडला नाही.