विजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान

0 77

प्रो कबड्डीमध्ये झालेल्या १४व्या सामन्यात यु.मुंबा आणि दबंग दिल्लीला ३६-२२ अश्या मोठ्या फरकाने हरवले. यु मुबासाठी कर्णधार अनुप कुमारने रेडींगमध्ये उत्तम खेळ केला आणि संघाने डिफेन्समध्ये सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सामना खिशात घातला. दिल्ली संघासाठी मेराज शेखने रेडींगमध्ये गुण मिळवले तर डिफेन्समध्ये निलेश शिंदेने चांगली कामगिरी केली.

पहिल्या सत्रात दिल्लीने गुणांचे खाते उघडत २-० अशी आघाडी मिळवली. पण त्यानंतर मुंबा संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत दहा गुण मिळवत सामन्यात १०- २ अशी बढत मिळवली आणि दिल्ली संघाला ऑलआऊट केले. या सत्रात नंतर मुंबा संघाने खेळाचा वेग कमी केला आणि हे सत्र संपले तेव्हा १४-८ अशी या सामन्यात बढत कायम ठेवली.

सामन्याचे दुसरे सत्र सुरु झाले आणि यु मुंबा संघ सामन्यात मागे पडत चालला होता. सामन्यात यु मुंबाचा संघ ऑल आऊट होण्याच्या स्थितीत असताना मुंबा संघाने मेराज शेखला सुपर टॅकल केले आणि दोन गुणांची कमाई केली आणि विरोधी खेळाडू बाद झाला म्हणून अनुप कुमारला मैदानात येण्याची संधी मिळाली. त्यानंतर मुंबा संघाने निष्काळजीने टॅकल करण्याच्या प्रयत्नात २ खेळाडू गमावले आणि अनुप शेवटचा खेळाडू राहिला. त्यानंतर लगेच दुसऱ्या सत्राच्या १० व्या मिनिटाला अनुपने सुपर रेड करत संघाला ऑल आऊट होण्यापासून वाचवले. या नंतर मुंबा संघाने उत्तम डिफेन्सिव्ह खेळाचे प्रदर्शन करत सामना ३६-२२ असा खिशात घातला.

खेळाच्या सर्व पातळ्यांवर यु मुंबाचा संघाने उत्तम कामगिरी केली. तीन सामन्यात दोन विजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: