दिपक हुडा असणार ‘ पुणेरी पलटणचा ‘ कर्णधार!

पुणेरी पलटण संघाने दिपक निवास हुडा याची प्रो कबड्डीच्या पाचव्या पर्वात कर्णधार म्हणून निवड केली आहे. यामुळे दिपक पहिल्यांदाच कर्णधाराच्या भूमिकेत  दिसेल.

पुणेरी पलटणने मागच्या पर्वातील कायम केलेला असा दिपक एकमेव खेळाडू होता त्यामुळे कर्णधारपदी त्याची निवड निश्चित मानली जात होती. मात्र लिलावानंतर धर्मराज चेरलाथन या अत्यंत अनुभवी आणि पाटणा पायरेट्सला आपल्या नेतृत्वाखाली विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूचा  पुण्याच्या ताफ्यात समावेश झाल्याने तोही कर्णधारपदाच्या शर्यतीत होता. शेवटी पुण्याने अनुभवापेक्षा युवा नेतृत्वाला संधी देण्याचे ठरवले आहे.

२३ वर्षीय हुडा युवा असला तरी आपल्या सयंमी खेळासाठी ओळखला जातो.अष्टपैलू खेळाडूंमध्ये मंजीत चिल्लर नंतर त्याचेच नाव घेतले जाते. प्रो कबड्डीत ५७ सामने खेळणारा  हुडा ‘दक्षिण आशियाई खेळ २०१६’ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. ‘विश्वचषक स्पर्धा २०१६’ मध्येही त्याने भारताचे प्रतिनिधीत्व  केले होते.

त्याच्या नेतृत्वाखाली पुण्याचा संघ कसा खेळ करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल !

 

-शारंग ढोमसे  (टीम महा स्पोर्ट्स )