प्रो कबड्डी: पटणा लेगमधील ड्रीम प्रो कबड्डी टीम

प्रो कबड्डीचा पटणा मुक्काम खूप विक्रमांचा लेग ठरला. या मुक्कामात अनेक विक्रम मोडले गेले तर काही नवीन विक्रम येथे प्रस्थापित झाले. या मुक्कामात प्रदीप नरवालने सर्वांची मने जिंकली. राहुल चौधरी याने ६०० रेडींग गुणांचा टप्पा गाठला. रोहित कुमारने ३०० रेडींग गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला. गुजरात फॉरचून जायन्टस संघाच्या सचिन आणि फझल अत्राचली यांनी चांगली कामगिरी करत आपल्या नावाची दाखल घेण्यास भाग पाडले.

अनेकांनी या लेगमध्ये उत्तम कामगिरी केली परंतु असे काही खेळाडू होते ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यांची कामगिरी खरोखर वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे या लेगमध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्या खेळाडूंचा संघ बनवण्याचा प्रयत्न
केला आहे.

#१ संदीप नरवाल- राईट कॉर्नर
संदीपने हरियाणा विरुद्ध झालेलया सामन्यात डिफेन्समध्ये खूप चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात या मोसमातील त्याचा पहिला हाय फाईव्ह मिळवला. त्याच बरोबर या सामन्यात त्याने रेडींगमध्ये गुण मिळवत २०० रिडींग गुण मिळवण्याचा कारनामादेखील केला. संदीप फक्त दुसरा असा खेळाडू बनला ज्याने रेडींगमध्ये २०० आणि डिफेन्समध्ये १५० पेक्षा गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

#२ मोनू गोयत – राईट इन
मोनूने घरच्या मैदानावरील सामन्यात खूप चांगले प्रदर्शन केले. त्याने खेळलेल्या सहा सामन्यात ५४ गुण मिळवले. त्यात त्याने चार सुपर टेन मिळवले. त्याने स्वतःला प्रदीप नरवालच्या छायेतून बाहेर काढत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

#३ सिद्धार्थ – राईट कव्हर
जयपूरच्या या खेळाडुने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात अतिशय उत्तम कामगिरी करताना हाय फाईव्ह मिळवला. त्याने या सामन्यात मेराज शेखला सुपर टॅकल केले. जेव्हा जयपूरचे फक्त दोन खेळाडू मैदानात होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर जयपूर पिंक पँथरने हा सामना जिंकला.

#४ नितीन तोमर- सेन्टर
युपीच्या रेडींगचा सर्व भार नितीनने त्याच्या खांद्यावर घेतला आहे. या खेळाडूने मागील तिन्ही सामन्यात सुपर टेन कमावताना १२६ गुण मिळवले आहेत. पटणा लीगच्या शेवटच्या सामन्यात त्याच्या १६ गुणांच्या जोरावर युपीने पटणा पायरेट्सला पराभवाचा दणका दिला होता. या लेगमध्ये दोन सामन्यात मिळून नितीनने ३० गुणांची कमाई केली होती.

#५ परवेश भंसल- लेफ्ट कव्हर
गुजरात संघासाठी या मोसमात सातत्याने उत्तम कामगिरी करणारा परवेशने यु मुंबा विरुद्धच्या सामन्यात हाय फाईव्ह मिळवला. हा त्याचा पहिला हाय फाईव्ह होता. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे यु मुंबाच्या रेडर अतिरिक्त दबाव आला. त्यात यु मुंबासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या श्रीकांत जाधवला त्याने या सामन्यात जखडून ठेवले. त्यामुळे यु मुंबाला सामना गमवावा लागला.

#६ प्रदीप नरवाल- लेफ्ट इन
प्रदीपने घरच्या लेगमध्ये सहा सामन्यात ७५ रेडींग गुणांची कमाई केली. त्याने एका मोसमात २०० रेडींग गुण मिळवण्याचा पराक्रम केला. डुबकी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीपने सहा सामन्यात पाच वेळा सुपर टेन कमावला. या खेळाडूला रोखणे कोणत्याच संघाला जवळजवळ अशक्य झाले आहे. त्याने हीच लय कायम ठेवली तर तो एका मोसमात ३०० रिडींग गुण मिळवण्याचा पराक्रम देखील करू शकतो.

#७ लेफ्ट कॉर्नर- फझल अत्राचली
फझल अत्राचलीने मागील काही सामन्यात उत्तम कामगिरी केलेली नव्हती. त्याने यु मुंबा विरुद्धच्या सामन्यात हाय फाईव्ह मिळवत सहा गुणांची कमाई केली. त्याने यु मुंबाच्या रेडींग डिपार्टमेंटचे कंबरडे मोडत गुजरातला हा सामना जिंकून देण्यात मोठा वाट उचलला.