टॉप ५: या पाच खेळाडूंवर असणार प्ले-ऑफमध्ये लक्ष !

प्रो कबड्डीचा प्रवास साखळी सामने पार करून सुपर प्ले ऑफच्या दिशेने सुरु आहे. साखळी सामन्यात दोन्ही झोनमधून १३२ सामने खेळवले गेले आहेत. या सामन्यांतून प्ले ऑफसाठीचे संघ निश्चित झाले आहेत. प्ले ऑफमधील सहा संघातून एक संघ विजेता ठरणार आहे. प्ले ऑफचा थरार प्रो कबड्डीसाठी नवीन आहे तरी देखील यातील सामने प्रेक्षांकाची मने जिंकतील असा विश्वास आहे.

या लेखात आपण चर्चा करू अश्या पाच खेळाडूंची जे प्ले ऑफच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात.

#५ सुरिंदर नाडा – ( हरयाणा स्टीलर्स )
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात सुरिंदर नाडाचा खेळ खूपच बहारदार झाला आहे. हरयाणा स्टीलर्स संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे ज्यावेळी सोपवण्यात आले त्यावेळेपासून त्याने ही जबाबदारी लीलया पेलली आहे आणि जाबबदारी सोबतच खेळ खूप उंचावला. पाचव्या मोसमात हरयाणा स्टीलर्सच्या पहिल्या पाचही सामन्यात ‘हाय फाय’ मिळवत त्याने विक्रम केला.

प्रो कबड्डीमध्ये हरयाणा स्टीलर्स असा संघ आहे ज्या संघाचे रेडींगमधील गुणांपेक्षा डिफेन्समधील गुण अनेकदा जास्त असतात. त्यात सुरिंदर नाडा याचा खूप मोठा वाटा असतो. सुरिंदर या मोसमात बेस्ट डिफेंडर्सच्या यादीत ७९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने सर्वाधीक ७३ यशस्वी टॅकल केले आहेत. सर्वाधिक हाय फाय मिळवण्याच्या यादीत तो सर्वाधीक ९ हाय फाय मिळवत सुरजीत सिंग सोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे.

या सर्व आघाड्यांवर राहून त्याने हरयाणा स्टीलर्स संघाला प्ले ऑफसाठी पात्र ठरवण्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे प्ले ऑफसाठी त्यावर सर्वांची नजर असणार आहे.

#४ फझल अत्राचली- (गुजरात फॉरचूनजायन्टस )
प्रो कबड्डीमध्ये या इराणियन डिफेंडरची जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. त्याच्या बॅक होल्ड कौशल्याचे सारे कबड्डीप्रेमी दिवाने आहेत. गुजरातसाठी लेफ्ट कॉर्नर खेळणाऱ्या फझलच्या क्षेत्रातून गुण मिळवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फझलने साखळी सामन्यात ५५ टॅकल गुण मिळवले आहेत. बाकी डिफेंडर्सच्या तूलनेत हे गुण कमी वाटत असतील पण फझलच्या क्षेत्रात जाऊन गुण मिळवण्याची हिंमत खूप कमी रेडर करतात.

जर रेडर फझलच्या क्षेत्रात आलेच नाहीत तर त्यांना राईट कॉर्नरवरून गुण घ्यावे लागतील तेथे देखील अबोझार मिघानी आहे. मिघानीने जर कोणते टॅकल करण्याच्या प्रयन्त केला तर त्याला साथ देण्यासाठी फझल लगेच पुढे सरसावतो. त्यामुळे फझल खूप महत्वाचा खेळाडू आहे. मोठ्या संघाविरुद्ध फझलची कामगिरी नेहमीच उत्तम राहिली आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये त्याचावर नजर ठेवावी लागेल.

#३ रिशांक देवाडीगा – (युपी योद्धा)
डू ऑर डाय रेडर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा रिशांक युपी योद्धाचा मुख्य खूप रेडर म्ह्णून पुढे आला आहे. त्याने या मोसमात जयपूर लेग मधील शेवटच्या सामन्यात जयपूर संघाविरुद्ध जबरदस्त रेडींगचे प्रदर्शन करताना २८ रेडींग गुण मिळवले होते. त्याने अशा प्रकारचा खेळ जर प्ले ऑफमध्ये दाखवला तर युपी संघ अंतिमफेरीत पोहचू शकतो, त्यामुळे प्ले ऑफमधील सामन्यात युपी योद्धा संघाच्या या रेडरवर सर्वांच्या नजरा असतील.

#२ मनिंदर सिंग-(बेंगाल वॉरियर्स)
प्रो कबडीच्या पहिल्या मोसमात विजेता ठरलेला हा खेळाडू त्यानंतरच्या मोसमात खेळला नव्हता. पहिल्या मोसमात १०० पेक्षा जास्त रेडींग गुण मिळवणाऱ्या या खेळाडूने या मोसमात देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर बेंगाल वॉरियर्स झोन बीमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले आहे. त्यांचा सामना गुजरात फॉरचूनजायेंटन्स विरुद्ध असणार आहे. हा सामना जिंकला तर बेंगाल वॉरियर्स प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदा अंतिमफेरी गाठेल. त्यामुळे त्याचा कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

#१ प्रदीप नरवाल -(पटणा पायरेट्स)
डुबकी किंग म्हणून प्रो कबड्डीमध्ये ओळखला जाणारा पटणा पायरेट्स संघाचा कर्णधार प्रदीप नरवाल प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात सर्वात यशस्वी रेडर आहे. त्याने या मोसमात खेळल्या २२ सामन्यात २७४ रेडींग गुण आहेत. तो एका मोसमात २५० पेक्षा जास्त रेडींग गुण मिळवणारा पहिला आणि एकमात्र खेळाडू आहे.

मागील काही सामन्यात त्याला त्याच्या कामगिरीला न्याय देता आलेला नाही परंतु जर त्याने त्याची लय पकडली तर पटणाला सलग तिसऱ्यांदा अंतिमफेरीत पोहचण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तो एका सामन्यात सरासरी १३ रेडींग गुण मिळवतो म्हणून प्ले ऑफमध्ये त्याच्या कामगिरीवर सर्वाधीक नजरा असतील.