प्रो कबड्डी: ही दोस्ती तुटायची नाय, सुरेंदर नाडा आणि मोहित चिल्लर

काही खेळाडूंच्या जोड्या ह्या कायमच प्रसिद्ध राहिल्या आहेत. क्रिकेटप्रमाणे प्रो कबड्डी मध्येही या जोड्या आहेत. त्यातील एक खास जोडी आहे सुरेंदर नाडा आणि मोहित चिल्लर यांची.

सुरेंदर नाडा आणि मोहित चिल्लर ही दोन्ही नावे प्रो कबड्डीमुळे घराघरात पोहोचलेली आहेत. हे दोन्ही खेळाडू प्रो कबड्डीतील उत्कृष्ट डिफेंडर्स म्हणून ओळखले जातात. आपल्या सुरेख “कॉम्बिनेशन टॅकल्स” साठी हे दोघे ओळखले जातात.

प्रो कबड्डीच्या ५ व्या पर्वातही या जोडगोळीचा खेळ बघण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. या पर्वात ही जोडी “हरयाणा स्टीलर्स ” संघाकडून खेळतील.

सुरेंदर नाडा
आपल्या “अँकल होल्ड” साठी प्रसिद्ध असणाऱ्या सुरेंदरच्या नावावर प्रो कबड्डीत आतापर्यंत तब्बल १३८ डिफेन्स गुण आहेत. तसेच प्रो कबड्डीत कर्णधार पदाचा अनुभव असल्याने तो या पर्वात हरयाणा संघाचे कर्णधार पद  भूषवू शकतो.

मोहित चिल्लर
२४ वर्षीय मोहितकडे भारतीय कबड्डीचे भविष्य म्हणून पहिले जाते. १७४ डिफेन्स गुण मिळवून त्याने हा विश्वास सार्थ ठरवला आहे. मूळचा हरयाणाचा असणारा मोहित त्याच्या “डायविंग अँकल होल्ड ” साठी ओळखला जातो.

विशेष म्हणजे आतापर्यंतच्या सर्व पर्वात हे दोन्ही खेळाडू एकाच संघाकडून खेळले आहेत. पहिल्या तीन  पर्वांत “यु मुम्बा” चे प्रतिनिधित्व करताना दुसऱ्या पर्वात “यु मुम्बा”ला विजेतेपद मिळवून देण्यात या दोघांचा मोलाचा वाटा होता.

चौथ्या पर्वातही दोघे “बेंगळुरू बुल्स “कडून खेळले. “कबड्डी विश्वचषक २०१६” मध्येही अंतिम सामन्यात मोक्याच्या क्षणी सुपर टॅकल्स करत या दोघांनी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

त्यामुळे ५ व्या पर्वात ही जोडी कसा खेळ करते याकडेच कबड्डी रसिकांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

– शारंग ढोमसे