खेळ कबड्डी भाग-३: प्रो कबड्डीची चार पर्व

 

प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीच्या एका नव्या युगाला (पर्वाला) सुरुवात झाली. कबड्डी खेळाची लीग खेळण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा उदयोग समूहाने पुढाकार घेतला आणि प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाची घोषणा केली. आपल्या देशात कबड्डी हा अतिशय लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे कबड्डी खेळाला एका नवीन स्वरूपात पाहण्यासाठी कबड्डीप्रेमीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पूर्वीपासून कबड्डी खेळाविषयी लोकांमध्ये प्रेम भावना आहे. खेळाला उत्तम प्रोत्साहन देणारी ‘स्टार स्पोर्ट्स’ टेलिव्हिजन वाहिनीमुळे प्रो कबड्डी घरोघरी पोहचली. ‘स्टार स्पोर्ट्स’ मूळे कबड्डीतील खेळाडूंना नवीन ओळख निर्माण करून दिली.

खेळ म्हटलं की नियम आलेच पण कबड्डी खेळाची रुची वाढण्यासाठी आणि खेळाची गती वाढवण्यासाठी काही बदल आवश्यक होते. त्यामुळे प्रो कबड्डीमध्ये काही नवीन नियम लागू केले. चढाईसाठी ३० सेंकदाचा कालावधी ठेवण्यात आला. कबड्डीमधील रिकाम्या रेड मूळे ‘डू ऑर डाय रेड’ तिसरी चढाई निर्णायक करण्यात आली. अशाप्रकारे काही चांगले बदल करून प्रो कबड्डीने खेळाची गती वाढवली. नवीन बदलामुळे कबड्डी पाहणाऱ्याची संख्या वाढली.

प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वाचा लिलाव मे २०१४ मध्ये घेण्यात आला. भारतीय कबड्डी संघातील राकेश कुमारला पाटणा संघाने १२.८० लाखाला खरेदी केलं. २६ जुलै २०१४ ला मुंबईला उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. यू मुंबा वि. जयपूर पिंक पँथर या दोन संघामध्ये सलामीचा झाला. हा सामना यू मुंबाने जिंकला. ३१ ऑगस्टला अंतिम समनासुद्धा याचं दोन संघांमध्ये झाला होता. जयपूरने मुंबाला नमवुन पहिल्या पर्वाच विजेतेपद पटकावले. पहिल्या पर्वात भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार “अनूप कुमारला बेस्ट प्लेअर अवॉर्ड” देण्यात आला. पहिला पर्व यशस्वीपणे पार पडल्यानंतर पुढील पर्वाची घोषणा करण्यात आली.

१८ जुलै ते २३ ऑगस्ट २०१५ यादरम्यान झालेल्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद यू मुंबा संघाने पटकावले. दुसऱ्या पर्वात बंगळुरू बुल्सचा “मनजीत चिल्लरला बेस्ट प्लेअर अवॉर्ड” देण्यात आला. दुसऱ्या पर्वाचे सामन्याचे प्रक्षेपण पाच भाषामध्ये करण्यात आले.

दोन यशस्वी पर्वानंतर २०१६ मध्ये एकाच वर्षात दोन पर्व होणार अशी घोषणा करण्यात आली. कबड्डीप्रेमीसाठी ही आनंदाची बातमी होती. ३० जानेवारी ते ५ मार्च २०१६ दरम्यान तिसरा पर्व खेळवण्यात आला. खेळ नियमात आणि शिस्तबद्ध होण्यासाठी यापर्वापासुन काही तांत्रीक गुण आणि ग्रीन कार्ड, येल्लो कार्ड, रेड कार्डचा वापर करण्यात आले. एकदा उपविजेता आणि विजेतेपद मिळवलेल्या यू मुंबाने सलग तिसऱ्या पर्वात अंतिम फेरीत गाठली. पण अंतिम सामन्यात पाटणाने यू मुंबाला हरवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले तर ‘रोहित कुमार ला बेस्ट प्लेअर अवॉर्ड” चा मानकरी ठरला. जून २०१६ मध्ये ४ था पर्वाची सुरुवात झाली. पहिल्या पर्वाचे आणि तिसऱ्या पर्वाची विजेते यांच्यामध्ये अंतिम सामना झाला आणि पाटणाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. पोस्टरबॉय “राहुल चौधरीला बेस्ट प्लेअर अवॉर्ड” देण्यात आला.

कबड्डी हा खेळ फक्त पुरुषापुरता मर्यादित नसून तो महिलेसाठी पण आहे. महिलांसाठी पण कबड्डी लीग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. ४ था पर्वात प्रथमच महिला साठी “वूमन कबड्डी चॅलेंज” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन महिला संघांमध्ये झालेल्या यास्पर्धेत स्टॉर्म क्विन्सने विजेतेपद पटकावले.

प्रो कबड्डी लीगच्या चारही पर्वात सामने दुहेरी साखळी पद्धतीने खेळवण्यात आले. साखळीत एकूण ५६ सामने खेळवण्यात आले. २ उपांत्य सामने, तिसऱ्या क्रमांकासाठी, आणि अंतिम सामना असे प्रत्येक पर्वात एकूण ६० सामने खेळवण्यात आले. चार पर्वाच्या यशानंतर कबड्डी खेळ खूप पुढे गेला आहे म्हणून प्रो कबड्डी लीगचा पुढील पर्वात विस्तार करायचे ठरवले.

-अनिल विठ्ठल भोईर
(लेखक कब्बडी अभ्यासक असून कबड्डी पंच म्हणून देखील काम पाहतात)