प्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग !

प्रो कबड्डी ५व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत. यंदाचा मोसम खेळाडूंसाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे. या मोसमात प्रो कबड्डीमध्ये खेळणाऱ्या संघाची संख्या आठवरून बारा केली गेली आहे त्यामुळे जास्तीत खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्ली असा संघ आहे ज्याला प्रेक्षकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असतो असे असूनही या संघाला या स्पर्धेची सेमी फायनलही गाठता आलेले नाही.

दबंग दिल्लीच्या खेळाडूंची दबंगगिरी स्पर्धेत अनेक वेळा चालते पण ते संघाला विजयी करून देण्यात कुठेतरी कमी पडतात आणि मोक्याच्या वेळी नांगी टाकतात. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या चार संघात असणारा दिल्लीचा संघ स्पर्धेच्या शेवटी तळाच्या चार संघात असतो. या संघाची मागील चारही मोसमातील कामगिरी अनुक्रमे ६,७,८,७ या क्रमांकांची राहिलेली आहे. प्रो कबडीच्या दुसऱ्या मोसमात तर स्पर्धेतील बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडर संघात असूनदेखील दबंग दिल्लीच्या संघाला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दबंग दिल्लीचा संघ यावेळी डिफेन्समध्ये मजबूत भासत आहे कारण संघाकडे दोन स्पेशालिस्ट डिफेंडर आहेत, एक म्हणजे राईट कॉर्नर निलेश शिंदे आणि दुसरा म्हणजे राइट कव्हर बाजीराव होडगे. रेडींगमध्ये रवी दलाल हे मोठे नाव आहे जे दबंग दिल्लीची वाटचाल सेमी फायनल पर्यंत घेऊन जाण्यासाठी उत्तम कामगिरी करू शकतो. पण पहिल्या मोसमानंतर रवी दलाल आपला खेळ उंचावू शकला नाही.

दबंग दिल्ली संघाची खरी ताकद आहे त्यांचा कर्णधार  मिराज शेख. मिराज आपल्या रेडींग आणि डिफेन्सिव्ह खेळाने दबंग देखील एकहाती विजय मिळवून देऊ शकतो आणि तो यावर्षी दिल्लीचा कर्णधार असणार आहे. मिराजला प्रो कबडीमध्ये सलग चार वर्ष खेळण्याचा अनुभव पण आहे आणि तो इराणच्या राष्ट्रीय कब्बडी संघाचा कर्णधार असल्याने कर्णधारपदाचा देखील अनुभव आहे. मिराजने  भारतामध्ये झालेल्या विश्वचषकात इराण संघाला अंतिम फेरीत  घेऊन आला होता तशीच कामगिरी त्याने दिल्ली संघासाठी करावी अशी अपेक्षा दिल्ली संघाचे पाठीराखे करत आहे.

दिल्ली संघातील हे चार खेळाडू दबंग दिल्लीला सेमी फायनल पर्यंत घेऊन जाऊ शकतात.
१  रवी दलाल-रेडर
२ मिराज शेख -(कर्णधार)ऑलराऊंडर
३ बाजीराव होडगे -राइट कव्हर
४ निलेश शिंदे-राइट कॉर्नर