प्रो कबड्डी: हे असतील बंगालचे पाचव्या मोसमातील वॉरियर्स

प्रो कबड्डी ५वा मोसम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९० दिवस चालणारा हा महासंग्राम  २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता सुरु होईल. स्पर्धेचा उदघाटनाचा सामना राहुल चौधरीच्या तेलगू टायटन्स विरुद्ध अजय ठाकूरच्या तामिल थालयवाज या दोन संघात खेळवला जाणार आहे. स्पर्धेशी चार नवीन संघ जोडले गेले असले तरी अगोदरच्या संघांच्या पाठिराख्यांना त्यांचेच संघ जिंकणार असा विश्वस आहे. आपण आज आपण बेंगाल वॉरियर्स संघाचा विचार करूया.

मागील चार मोसमात बेंगाल वॉरियर्स संघाची ताकद त्यांचे डिफेंडर होते.  ते डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करायचे पण संघाची रेडींगमधील कामगिरी फारशी दखल घेण्याजोगी नव्हती. वॉरियर्सचा फक्त एक रेडर चांगली कामगिरी करत होता तो म्हणजे कोरियन रेडर जाँग कुन ली. जाँग कुन लीला रेडींगमध्ये साथ देणारा एकही खेळाडू  संघात नव्हता. नितिन मदने  हा रेडर होता पण तो पहिल्या मोसमानतर जायबंदी झाल्यामुळे परत संघासाठी काही उपयुक्त कामगिरी करू शकला नाही. जाँग कुन ली हा प्रो कबड्डीच्या इतिहासामधील १०व्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी रेडर आहे.

यावर्षी बेंगाल वॉरियर्स संघाकडे उत्तम रेडर आहेत जे सामना जिंकवून देऊ शकतात. मनिंदर सिंग हा असाच एक रेडर आहे जो जयपूर पिंक पँथर संघासाठी मागील सर्व मोसम खेळला. त्याला जसवीर सिंगच्या छायेच्या बाहेर पडता आले नाही. संघासाठी उत्तम कामगिरी करूनही त्याचे नाव खूप मोठे झाले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या मोसमात मनिंदर सिंगने खूप  चांगला खेळ केला होता आणि मोक्याच्या वेळी संघाला  रेडींगमधील गुण मिळवून दिले होते. दीपक नरवाल हा आणखी एक गुणी  रेडर जो बंगालच्या संघाकडून खेळणार आहे. तोही मोक्याच्या वेळी संघासाठी उत्तम कामगिरी करू शकतो. संघाचे प्रशिक्षक के.के. जगदेशा हे मनिंदर सिंगला डू ऑर डाय रेडर म्हणून खेळवतील आणि दीपकला दुसरा रेडर म्हणून खेळवण्याची शक्यता आहे.

बेंगाल वॉरियर्स संघाकडे दोन उत्तम ऑलराऊंडर आहेत जे संघासाठी कोणत्याही जागेवर खेळू शकतात. यु मुंबाचा प्रोडक्ट असणारा भूपिंदर सिंग आणि दुसरा म्हणजे जयपूरची मागील काही मोसमात डिफेंडरची भूमिका बजावणारा रण सिंग. हे खेळाडू कॉर्नरही खेळू शकतात तर भूपिंदर हा उत्तम रेडरही आहे. प्रशिक्षक के.के. जगदेशा यांना डिफेन्सिव्ह संघ खेळवायचा नसून ते तीन रेडर आणि भूपिंदर संघात खेळवतील असे वाटते. पण संघाने भारतीय संघातील डिफेन्समधील आणि यु मुंबाचा मागील मोसमात चांगली कामगिरी करणारा खेळाडू सुरजीत सिंग याला संघाचा कर्णधार घोषित केले आहे.

असा असेल  बेंगाल वॉरियर्सचा संभाव्य संघ
१ जाँग कुन ली- रेडर
२ मनिंदर सिंग- रेडर
३ दीपक नरवाल-रेडर
४ भूपिंदर सिंग-ऑलराऊंडर
५ रण सिंग-लेफ्ट कॉर्नर(ऑलराऊंडर)
६ श्रीकांत वानखेडे-लेफ्ट कव्हर
७ सुरजीत सिंग-राइट कव्हर(कर्णधार)