आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी, पुजारा चालला या देशात खेळायला

भारतीय संघातील ‘नवी वॉल’ अशी ओळख असणाऱ्या चेतेश्वर पुजाराला आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे येत्या मोसमात तो इंग्लंड देशात खेळायला जाणार आहे.

तो यॉर्कशायर संघाकडून चेतेश्वर पुजारा पुन्हा खेळताना दिसणार आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्थात काउंटी क्रिकेटमध्ये तो खेळताना दिसणार आहे.

पुजाराचा या संघासोबत करार हा काही आठवडे आधीच झाला होता. परंतु आयपीएल लिलावामुळे त्याची घोषणा झाली नव्हती. पुजाराला या लिलावातून एखाद्या संघाकडून खेळायला मिळण्याची अपेक्षा होती.

पुजारा आता ७ एप्रिल पासून यॉर्कशायर संघासोबत खेळताना दिसणार आहे. तो भारतात जून महिन्यात परतेल. कारण तेव्हा भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी परतणार आहे.

२०१५मध्ये पुजारा प्रथमच काउंटी क्रिकेट खेळला होता. यात त्याने यॉर्कशायरकडून खेळताना ४ सामन्यात ५२.८०च्या सरासरीने २६४ धावा केल्या होत्या.

पुजाराने यापूर्वी डर्बशायर आणि नौटिंगहॅमशायरकडूनही काउंटी क्रिकेट खेळले आहे. २०१७मध्ये त्याने नौटिंगहॅमशायरकडून खेळताना २७.७५च्या सरासरीने ३३३ धावा केल्या आहेत.

१९९२ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला होता. तेव्हा त्याने यॉर्कशायरकडून खेळताना जखमी क्रेग मॅकडर्मोत्तच्या जागी भाग घेतला होता. याबरोबर युवराज सिंगनेही या स्पर्धेत भाग घेतला आहे.