दिल्लीतही गोलांचा पाऊस पाडण्याचे गोव्याचे लक्ष्य

0 131

नवी दिल्ली | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाची शनिवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनॅमोजविरुद्ध लढत होत आहे. घरच्या मैदानावर गोलांचा पाऊस पाडल्यानंतर आता राजधानीतही अशाच कामगिरीचा निर्धार गोव्याने केला आहे.

तीन किंवा जास्त गोलांनी जिंकल्यास गोवा गुणतक्‍त्यात आघाडी घेऊ शकतो. गोव्याने जिंकलेल्या प्रत्येक सामन्यात किमान तीन गोल केले आहेत. त्यांनी केवळ एकच सामना गमावला आहे. दुसरीकडे दिल्लीने सलग तीन सामने गमावले आहेत. साहजिकच दिल्लीविरुद्ध गोव्याला विजयाचा आत्मविश्वास वाटतो.

गोव्याच्या संघाने शैलीदार आणि जोशात खेळ केला आहे. इतर संघांना याची सर आलेली नाही. फॉर्मात असलेल्या स्ट्रायकरच्या जोडीचा गोव्याला फायदा होत आहे. फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लॅंझारोटे यांना विलक्षण फॉर्म गवसला आहे. कोरोने लीगमध्ये सर्वाधिक सात गोल केले आहेत, तर मॅन्युएलच्या नावावर चार गोल आहेत. गोव्याने नोंदविलेल्या 13 पैकी 11 गोल या दुकलीने केले आहेत. गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांच्यासाठी एकच काळजीचा मुद्दा आहे. चार सामन्यांत गोव्याला एकदाही स्वीकारलेल्या गोलचे खाते रिक्त ठेवता आलेले नाही. त्यातच तीन सामन्यांत त्यांना किमान दोन गोल पत्करावे लागले आहेत.

स्पेनच्या लॉबेरा यांचे देशबांधव मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्यासमोर जास्त खडतर समस्या आहेत. एफसी पुणे सिटी, बेंगळुरू एफसी यांच्यापेक्षा दिल्लीचे सामने कमी आहेत. चेंडूला स्पर्श करण्याच्या संख्येत (टचेस) दहा संघांमध्ये दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीने 2824 टचेस साध्य केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सर्वाधिक 74 क्रॉस पासेस दिले आहेत. चौथ्या फेरीअखेर दिल्लीनेच सर्वाधिक पासेस दिले होते. या सरस आकड्यांचे प्रतिबिंब गोलमध्ये मात्र दिसत नाही. दिल्लीने चेंडूवर नियंत्रण ठेवले असले तरी चार सामन्यांत केवळ 28 शॉट मारले आहेत. हे प्रमाण हिरो आयएसएलमधील कोणत्याही संघापेक्षा कमी आहे. एटीकेप्रमाणेच दिल्लीला शारीरिक पातळीवर वर्चस्व राखता आलेले नाही. प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचे (टॅकल्स) त्यांचे प्रमाण केवळ 89 आहेत. हा आकडा एटीकेपेक्षा एकनेच जास्त आहे.

पोर्तुगाल यांनी सांगितले की, आम्ही वर्चस्व राखले असले तरी गोल केलेले नाही याची जाणीव आहे. आमचा संघ वर्चस्वाचे गोलमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

चेंडूवर नियंत्रण ठेवणे आणि अप्रतिम फुटबॉलचे प्रदर्शन करणे हे दोन्ही प्रशिक्षकांसाठी कसोटीचे मुद्दे असतील. गोलसमोर गोव्याने भेदक खेळाचे प्रदर्शन केले आहे. दुसरीकडे दिल्लीला गोलसमोर शॉट मारताना झगडावे लागले आहे. संपूर्ण लिगमध्ये त्यांचा गोलफरक उणे पाच (-5) इतका सर्वांत खराब आहे. यानंतरही घरच्या मैदानावर जिंकून तीन गुण वसूल केल्यास त्यांना गुणतक्‍त्यात सातवे स्थान गाठता येईल.

Comments
Loading...
%d bloggers like this: