आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत टीसीएस, ग्लोबल, सिमन्स, स्प्रिंगर नेचरचे विजय

पुणे ।टीसीएस, एफआयएस ग्लोबल, सिमन्स आणि स्प्रिंगर नेचर या संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत टीसीएस संघाने मर्स्क संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. यात मर्स्क संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६६ धावा केल्या. यात वैभव महाडिकने ६१ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९८ धावा केल्या. विक्रमजितसिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर टीसीएस संघाने विजयी लक्ष्य पाच गडींच्या मोबदल्यात १८.४ षटकांत पूर्ण केले.

दुसऱ्या लढतीत एफआयएस ग्लोबल संघाने टेक महिंद्रा संघावर सहा गडी राखून मात केली. टेक महिंद्रा संघाने दिलेले ११४ धावांचे लक्ष्य ग्लोबल संघाने सूरज दुबळच्या अर्धशतकाच्या जोरावर १३.५ षटकांत पूर्ण केले.

तिसऱ्या लढतीत गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर सिमन्स संघाने डेसॉल्ट सिस्टिम संघावर ११३ धावांनी मात केली. सिमन्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल डेसॉल्ट सिस्टिमचा डाव १३.३ षटकांत ४९ धावांत गारद झाला. चौथ्या लढतीत स्प्रिंगर नेचर संघाने झेन्सर संघावर पाच गडी राखून विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : १) मर्स्क – २० षटकांत ४ बाद १६६ (वैभव महाडिक नाबाद ९८, वेंकटेश अय्यर ३८, सुनील बाबर ३-२५, तेजपालसिंग १-३७) पराभूत वि. टीसीएस – १८.४ षटकांत ५ बाद १७० (विक्रमजितसिंग ७५, निकुंज अगरवाल ४८, दिनेश वाडकर २-२५, राघव त्रिवेदी १-२८).
२) टेक महिंद्रा – २० षटकांत ७ बाद ११३ (अंकित ठाकरे ३३, प्रतीक दुबे २६, गिरीश खडसे ३-१९, रोहित भाटलिया २-३३) पराभूत वि. एफआयएस ग्लोबल – १३.५ षटकांत ४ बाद ११४ (सूरज दुबळ ५७, प्रशांत पोळ २४, प्रतीक दुबे १-१५).
३) सिमन्स – २० षटकांत ९ बाद १६२ (सौरभ जळगावकर ३३, दीपक कुमार ३०, हिमांशू अगरवाल २६, नमन शर्मा २०, मंदार जोशी ३-३२, विकाश कुमार ३-२१, राजेश पाटील २-१४) वि. वि. डेसॉल्ट सिस्टिम – १३.३ षटकांत सर्वबाद ४९ (श्रीधर खासनिस ११, राहुल गायकवाड ३-७, सौम्या मोहंती २-७).
४) झेन्सर – २० षटकांत ८ बाद १२८ (सिद्धार्थ जलान २७, अमित दीक्षित १८, राजीव सगेखर २-१९, अविनाश अम्बाळे २-३२) पराभूत वि. स्प्रिंगर नेचर – १६.३ षटकांत ५ बाद १३० (प्रमोद मोडक ४२, राजीव एस ३२, सिद्धार्थ ३-१८).