राष्ट्रीय गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी

पुणे। इंडियन गोल्फ यांच्या मान्यतेखाली आयकॉनिक पूना क्लब गोल्फ कोर्स येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्यमान सिंग याने तिसरा क्रमांक पटकावत लक्षवेधी कामगिरी केली.

प्रतिष्ठित अशा कुमार मुलांच्या गटात देशभरातून विविध वयोगटातून अव्वल कुमार गोल्फपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. तत्पूर्वी आर्यमान याने मुलांच्या क गटात दुसऱ्या क्रमांकासाठी जबरदस्त चुरस दिली होती, परंतु अखेर त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या 9 होलच्या फेरीत सर्वात कमी दोषांकांसह ही फेरी पूर्ण करताना सर्व गटांमधील सर्वोत्तम कामगिरीची त्याने नोंद केली. या लक्षवेधी कामगिरीमुळे पदकाच्या शर्यतीत आर्यमानने तिसरा क्रमांक पटकावला असून पदकाचा मानकरी ठरलेला आर्यमान हा महाराष्ट्राचा सर्व गटांमधील एकमेव स्पर्धक ठरला आहे.