ISL 2018: एफसी पुणे सिटी संघाचा जमशेदपूर एफसीवर 2-1 ने दणदणीत विजय

गुण तक्त्यात एफसी पुणे सिटी संघाची अव्वल क्रमांकावर झेप

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीने आपली विजयी मालिका कायम ठेवत जमशेदपूर एफसी संघावर 2-1असा पराभव करत गुण तक्त्यात अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच चार सामन्यांच्या निलंबनानंतर परतले. त्यांच्यासह 6612 चाहत्यांसाठी हा निकाल आनंददायक ठरला. पुण्याने 12 सामन्यांत सातवा विजय मिळविला. एक बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.

पुण्याचे सर्वाधिक 22 गुण झाले. चेन्नईयीन एफसी (20) व बेंगळुरू एफसी (21) यांना मागे टाकत पुण्याने दोन क्रमांक प्रगती केली. बेंगळुरू व चेन्नईचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत.

जमशेदपूरला 12 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. चार विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह 16 गुण मिळवून त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले. वेलिंग्टन प्रिओरीने जमशेदपूरचे खाते उघडले होते.

62व्या मिनीटाला पुण्याला उजवीकडे कॉर्नर मिळाला. मार्सेलिनीयोने नेटसमोर मारलेल्या चेंडूवर गुरतेजने सरस उडी घेत हेडींग केले. चेंडू जमशमदेपरूचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या थोड्या बाजूने वरून नेटमध्ये गेला. 66व्या मिनीटाला अल्फारोने पाच सामन्यांत पहिला गोल केला. मार्सेलिनीयोने ही चाल रचली.

सामन्याची सुरवात सकारात्मक झाली. चौथ्याच मिनीटाला फारुख चौधरीने अवघड कोनातून फटका मारत पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याची कसोटी पाहिली. 11व्या मिनीटाला मार्सेलिनीयोने चाल रचली, पण त्यानंतर एमिलीयानो अल्फारो जास्त वेगाने धावत पुढे गेला आणि त्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला.

13व्या मिनीटाला आदिल खानने मारलेला चेंडू थेट स्टँडमध्ये गेला. त्यावेळी मार्किंग नसल्यामुळे त्याला व्यवस्थित अंदाज घेत फटका मारण्याची संधी होती. 17व्या मिनीटाला फारुख चौधरीने डावीकडून मुसंडी मारली, पण पुण्याच्या जोनाथन ल्युकाने त्याला रोखले.

25व्या मिनीटाला पुण्याला डावीकडे कॉर्नर मिळाला. त्यावर मार्सेलिनीयोने स्वतःच प्रयत्न केला, पण जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉलने दक्षता व चपळाई दाखवित अचूक बचाव केला.

पुर्वार्धात 29व्या मिनीटाला वेलींग्टन प्रिओरीने उजवीकडून मुसंडी मारली. त्यावेळी पुण्याचा साहील पन्वर त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करीत होता, पण त्याचवेळी विशाल कैथ त्याची जागा सोडून पुढे सरसावला.

त्याने मैदानावर घसरत प्रिओरीला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला आणि साहीलशी त्याची धडक झाली. त्यामुळे प्रिओरीला मैदान मोकळे मिळाले. त्याने ही सुवर्णसंधी दवडली नाही. या गोलमुळे पुण्याला घरच्या मैदानावर धक्का बसला.

34व्या मिनीटाला मार्सेलिनीयोने मध्य भागी क्रॉस पास दिला. त्यावेळी मार्किंग नसूनही ल्युकाला ताकदवान हेडींग करता आले नाही. त्यामुळे सुब्रतने चेंडू आरामात अडविला. 36व्या मिनीटाला त्रिंदादे गोन्साल्वीसने उजवीकडून आगेकूच केली. त्याने इझु अझुकाला पास दिला. त्यावर अझुकाने टाचेच्या मागच्या बाजूने मारलेला चेंडू थोडक्यात बाहेर गेला.

निकाल:

एफसी पुणे सिटी: 2 (गुरतेज सिंग 62, एमिलीयानो अल्फारो 66)
विजयी विरुद्ध जमशेदपूर एफसी: 1 (वेलींग्टन प्रिओरी 29)