ISL 2017: जमशेदपूरचा बचाव भेदत पुणे सिटीची सरशी

जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणाऱ्या जमशेदपूर एफसीचा बचाव भेदण्याचा पराक्रम एफसी पुणे सिटीने केला. पूर्वार्धात आदिल खान याने केलेल्या गोलच्या जोरावर पुण्याने एकमेव गोलने बाजी मारली.
जमशेदपूरने चार सामन्यांत एकाही प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करू दिला नव्हती. तब्बल चार क्लीन शीटची ही कामगिरी पुण्याविरुद्ध खंडित झाली. भारताचे प्रतिनिधीत्व केलेला अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याला चकविण्यात आदिल यशस्वी ठरला.
 
पुण्याने तिसाव्या मिनिटाला खाते उघडले. मेहताब होसेन याने मार्सेलो परेरा याला बॉक्सबाहेर डावीकडे पाडले. त्यामुळे पुण्याला फ्री-कीक बहाल करण्यात आली. त्यावर
मार्सेलोने अप्रतिम फटका मारत निर्माण केलेली संधी आदिलने साधली. आदिलने चेंडू पायाने नेटमध्ये अचूकपणे मारला.
त्यानंतर चव्वेचाळीसाव्या मिनिटाला जमशेदपूरचा गोल नाट्यमय घडामोडींनंतर ऑफसाईड ठरविण्यात आला. ट्रींडेड गोन्साल्वीसचा चेेंडू थोपविण्यात आला. शौविक घोषकडे चेंडू जाताच त्याने नियंत्रण मिळवित इझु अझुकाच्या दिशेने हवेत फटका मारला. अझुकाने ताकदीने हेडींग केले. चेंडू नेटमध्ये जाताच त्याने जल्लोष सुरु केला, पण काही सेकंदांत ऑफसाईडचा इशारा झाला.
 
मैदानाच्या दर्जात सुधारणा झाल्यामुळे खेळ वेगवान झाला. सुरवातीला जमशेदपूरच्या बिकाश जैरूने सिद्धार्थ सिंगच्या साथीत चाल रचली. सिद्धार्थने मारलेला फटका पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याने पुढे सरसावत थोपविला.
 
उत्तरार्धात जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी बदली खेळाडू उतरवित निकराचे प्रयत्न सुरु केले. सिद्धार्थच्या जागी आशिम बिश्वास, ट्रींडेडच्या जागी केर्वेन्स बेलफोर्ट असे बदल त्यांनी केले.
 
सत्तेचाळीसाव्या मिनिटाला पुण्याची संधी थोडक्यात हुकली. एमिलीयाने अल्फारो याने उजव्या बाजूने क्रॉस पास दिल्यानंतर मार्सेलो परेरा चेंडूपाशी जाऊ शकला नाही. इसाक वनमाल्साव्मा याने प्रयत्न केला, पण त्याने स्वैर फटका मारल्यामुळे चेंडू बाहेर गेला.
 
नऊ मिनीटे बाकी असताना पुण्याच्या लालछुआन्माविया फानाई याला दुसऱ्या पिवळ्या कार्डसह मैदान सोडावे लागले. बिश्वासला रोखण्याच्या प्रयत्नात त्याने धसमुसळा खेळ केला. त्याने कोपराने बिश्वासच्या चेहऱ्यावर मारले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
पुण्याचा एक खेळाडू कमी झाल्यामुळे जमशेदपूर फायदा उठविणार का याची उत्सुकता होती. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. दोन मिनिटे बाकी असताना फारुख चौधरीने डावीकडून क्रॉस पास दिला. त्यावर मेमोने ताकदवान हेडींग केले, पण पुण्याचा गोलरक्षक कैथने उजव्या हाताने चेंडू थोपविला आणि तो चपळाईने ताब्यात घेतला.
 
तेवीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांच्या उपस्थिती हा सामना पार पडला. अंतिम टप्यात मैदानाची अवस्था थोडी खराब झाल्याचे दिसून आले.
 
पुण्याचा हा पाच सामन्यांतील तिसरा विजय आहे. पुण्याचे नऊ गुण झाले आहेत. पहिल्या चार संघांचे प्रत्येकी नऊ गुण आहेत. यात बेंगळुरू एफसी (गोलफरक पाच), एफसी गोवा (चार), चेन्नईयीन एफसी (चार) आणि पुणे (तीन) असे पहिले चार संघ आहेत. जमशेदपूर सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.