पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनमधून राज्य संघटनेवर कोण तिघे जाणार?

पुणे | पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनची विशेष सर्वसाधारण सभा आज बालेवाडी, पुणे येथे पार पडली. यात घटनादुरुस्तीला मंजूरी देत अनेक विषयांवर चर्चा झाली. 

यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य संघटनेवर जाण्यासाठी तीन नावांवर यात चर्चा झाली. पुणे ग्रामीण, पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड यांमधील प्रत्येकी एका सदस्याला यात स्थान देण्यात येणार आहे. 

पुणे ग्रामीणमधून माजी उपमुख्यंत्री अजित पवार यांचे तर पिंपरी चिंचवडमधून आमदार महेश लांडगे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. पुणे शहरमधून राज्य संघटनेवर कोण जाणार यासाठी मात्र जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन प्रत्येक जिल्हा संघटनेला १० मे पुर्वी मतदानासाठी त्यांच्या ३ सदस्याच्या नावाची यादी देण्यास सांगितले आहे. यातुनच राज्य संघटनेची पंचवार्षिक कार्यकारणीसाठी निवडणूक होणार आहे. 

सध्या पुणे जिल्हा, बीड जिल्हा तसेच सांगली जिल्हा सोडून सर्व जिल्हा कबड्डी असोशिएशनने आपल्या ३ सदस्यांची नावे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनला दिली आहेत. 

पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन कोणत्या तीन सदस्यांना या संघटनेवर पाठवणार आहे यासाठी संघटनेच्या कार्यकारणीची बैठक ७ मे रोजी सकाळी १० वाजता बोलवण्यात आली आहे. 

पुणे शहरमधून अनेकजण उत्सुक असून त्यात कोणाची निवड होते हे लवकरच कळणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनची पंचवार्षिक निवडणूक २७ मे होणार आहे.