‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी सोमवारी (१० डिसेंबर) रंगणार 

पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाची ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी सोमवार १० डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम (मंगळवार पेठ) येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.

निवड चाचणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार होणार आहे. ही निवड चाचणी गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार असून माती विभागात५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो, ८६ किलो ते १२५ किलो वजनी गटांमध्ये, तर गादी विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो व ८६ किलो ते १२५ किलो अशा वजनी गटात ही निवड चाचणी होणार आहे.

या निवड चाचणीमध्ये केवळ पुणे शहरातील खेळाडूंचा समावेश राहणार आहे. सोमवारी (१० डिसेंबर) सकाळी साडे आठ ते ११.३० या वेळेत खेळाडूंची वजने केली जाणार असून दुपारी ३ पासून निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी मल्लांनी ३ फोटो, आधारकार्डची मुळ प्रत व झेरॉक्स घेवून येणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, सहसचिव गणेश दांगट, अविनाश टकले, खजिनदार मधुकर फडतरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.