अश्वारोहकांच्या फुटबॉल सामन्याने फुटबॉल दिनाला अनोखी रंगत

महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन अंतर्गत दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजन  
पुणे :  खेळाडूंऐवजी फुटबॉलच्या मैदानावर चक्क घोडयांसह घोडेस्वार उतरले आणि घोडयावरुनच त्यांच्यामध्ये फुटबॉलचा अनोखा सामना रंगला. दोन घोडयांचा एक संघ याप्रमाणे चार घोडेस्वार मैदानात समोरासमोर उभे ठाकले आणि तब्बल अडीच फूट उंचीच्या फुटबॉलचा अंतर्भाव करीत जागतिक स्तरावर खेळल्या जाणा-या या खेळाला वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे  यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमांतर्गत झालेल्या अश्वारोहकांच्या फुटबॉल स्पर्धेला प्रेक्षकांनी मोठया संख्येने हजेरी लावली.
कात्रज आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या आवारातील मैदानामध्ये दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी आणि डेक्कन इक्वेस्ट्रियन असोसिएशनच्यावतीने अश्वारोहकांच्या या आगळ्यावेगळ्या फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काजल बोरसे, मोहित बच्छाव, अनिकेत हलभावी आणि श्रीया पुरंदरे या अश्वारोहकांनी सहभाग घेत चित्तथरारक खेळ सादर केला. संस्थेचे गुणेश पुरंदरे आणि विनायक हळबे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र घुले, उद्योजक संतोषअप्पा दसवडकर, शिवाजी कोळी उपस्थित होते.
एरवी घोडयावरुन वेगवेगळ्या मोहिमा फत्ते करणा-या आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणा-या घोडेस्वारांनी घोडयावरुनच फुटबॉलचा आनंद लुटला. ग्रेसी, ज्वाला, चेतक, मस्तानी या चार घोडयांवरुन स्पर्धकांमध्ये ही लढत झाली. अवघ्या २० मिनीटांच्या सामान्यांमध्ये अनेकदा घोडयांनी देखील फुटबॉल पुढे ढकलत या खेळामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने प्रेक्षकांनी उत्स्फूर्त  दाद दिली.
संयोजक गुणेश पुरंदरे म्हणाले, महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमांतर्गत सर्वत्र फुटबॉल खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्वारोहणाच्या माध्यमातून अश्वारोहकांनी यामध्ये वेगळ्या पद्धतीने सहभागी व्हावे, याकरीता आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले. या विशेष सामन्याकरीता तब्बल अडीच फूट उंचीच्या फुटबॉलची खास निर्मीती करण्यात आली असल्याने घोडयावर बसून खेळात सहभागी होणे अश्वारोहकांना शक्य झाले.