२०१८ मध्ये पुण्यात येऊ शकतात टेनिसमधील दिग्गज खेळाडू, एटीपी वर्ल्ड टूर २५० स्पर्धा पुढील वर्षापासून पुण्यात

पुणे शहर २०१८ च्या जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेला ‘महाराष्ट्र ओपन’ असे नाव देण्यात आले आहे.

एटीपी वर्ल्ड टूर २५० प्रकारातील ही स्पर्धा असून ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक हे असोशिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल अर्थात एटीपी असते. ही स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे होणार आहे.

विशेष म्हणजे ही स्पर्धा सलग ५ वर्ष आयोजित करण्याचा मान पुणे शहराला मिळणार आहे. यापूर्वी भारतात एटीपी वर्ल्ड टूर २५० प्रकारची स्पर्धा चेन्नई शहरात चेन्नई ओपन नावाने होत होती. त्यानंतर दिल्ली ओपन आणि केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर टूर, पुणे या एटीपी चॅलेंजर टूर प्रकारातील दोन स्पर्धा भारतात होत आहेत. महाराष्ट्र ओपन स्पर्धेच्या रूपाने प्रथमच पुण्याला एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धेचे आयोजन सलग पाच वर्ष करण्याचा मान मिळाला आहे.

पुणे हे जगातील केवळ २८ वे शहर असेल जे एटीपीची स्पर्धा आयोजित करेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यापूर्वी ब्रिसबेन इंटरनॅशनल, कतार ओपन आणि चेन्नई ओपन ह्या एटीपीच्या स्पर्धा होत असत. त्यांनतर पुढील आठवड्यात एसीबी क्लासिक आणि आपिया इनेटरनॅशनल सिडनी ह्या स्पर्धा होऊन तिसऱ्या आठवड्यात मानाच्या ऑस्ट्रेलियन ओपनला सुरुवात होत असते.

परंतु दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या स्पर्धांना प्राधान्य देऊन दुसऱ्या आठवड्यातील स्पर्धा शक्यतो खेळत नाहीत. यात अगदी रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच सारख्या दिग्गजांचा समावेश असतो. त्यामुळे महाराष्ट्र ओपन ही जानेवारी पहिल्या आठवड्यात होणार असल्यामुळे दिग्गज टेनिसपटू पुण्यात टेनिसप्रेमींना पाहायला मिळू शकतात.

बालेवाडी येथील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे एटीपी चॅलेंजर स्पर्धेचं दरवर्षी यशस्वी आयोजन होतच आहे शिवाय यावर्षी पुण्यात डेव्हिस कप स्पर्धेचंही यशस्वी आयोजन फेब्रुवारी महिन्यात झालं होत.

यापूर्वी भारतात होणाऱ्या चेन्नई ओपन स्पर्धेत जगातील टेनिस दिग्गज जसे की बोरिस बेकर, पॅट्रिक राफ्टर, कार्लोस मोया, राफेल नदाल, मिलोस राओनिक आणि स्टॅन वावरिंका यांनी भाग घेतला होता. आधी गोल्ड फ्लेक ओपन आणि नंतर चेन्नई ओपन या नावाने ही स्पर्धा गेली २१ वर्ष सुरु होती.

पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथील सुविधा ह्या फक्त एटीपी दर्जाच्या नसून येथे खेळण्यासाठी खेळाडू तसेच सामानाधिकारी यांचीही कायम पसंती असते.

एटीपी वर्ल्ड टूर २५० प्रकारातील स्पर्धा म्हणजे काय? 

असोशिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल अर्थात एटीपी ही पुरुषांच्या टेनिसमधील सर्वोच्च बॉडी आहे. तिच्या मार्फत दरवर्षी एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १००० , एटीपी वर्ल्ड टूर ५०० आणि एटीपी वर्ल्ड टूर २५० या स्पर्धा खेळलेल्या जातात. २०१७-२०१८ या मोसमात ९ एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स १००० , १३ एटीपी वर्ल्ड टूर ५०० आणि ४० एटीपी वर्ल्ड टूर २५० खेळलेल्या जाणार आहे. १०००. ५०० आणि २५० असे पॉईंट्स ही स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूला मिळतात. त्याचा फायदा त्याला त्याची जागतिक क्रमवारी सुधारण्यासाठी तसेच वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल मध्ये टॉप-८ खेळाडूंमध्ये स्थान  मिळवण्यासाठी होतो.

पुण्यात होणारी स्पर्धा ही एटीपी वर्ल्ड टूर २५० प्रकारातील असल्यामुळे जिंकणाऱ्या खेळाडूला २५० पॉईंट्स मिळतील.