पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत सोलापूरच्या गणेश जगतापसमोर पंजाबच्या साबा कोहालीचे आव्हान

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचे सचिन येलभर, विकास जाधवला पराभवाचा धक्का

पुणे । खुल्या गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या गणेश जगतापने पुण्याच्या सचिन येलभरला तर पंजाबच्या साबा कोहालीने पुण्याच्या विकास जाधवला पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या गणेश जगतापने पुण्याच्या सचिन येलभरला ५-२ असे तांत्रिक गुणांच्या सहाय्याने पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. साबा कोहालीने भारद्वाज डावावर पुणे जिल्ह्याच्या विकास जाधवला चीतपट करताना अंतिम फेरीत धडक मारली.

विकास जाधवने भारद्वाज डावावर साबाला खाली खेचले, परंतू साबाने जोरदार प्रतिआक्रमण करताना विकासला चीतपट करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सोलापूरच्या गणेश जगतापसमोर साबा कोहलीचे आव्हान राहणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत सचिन येलभरने कृष्णाला पराभूत करताना तिसरे स्थान राखले.

७९ किलो गटात कोल्हापूरच्या रणजीत नलावडेने अहमदनगरच्या अजित शेळकेला ४-२ अशा तांत्रिक गुणांच्या पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. ४२ किलो वजनी गटात शुभम शिंदेने प्रथमेश धरवडकरवर ६-० अशा तांत्रिक गुणांच्या सहाय्याने विजेतेपद पटकावले.

४६ किलो वजनी गटात अजय फुलपगारने ऋषिकेश काळेल याला ५-२ अशा तांत्रिक गुणांच्या सहाय्याने पराभूत करताना विजेतेपद पटकावले. ५७ किलो वजनी गटात पुण्याच्या सागर मरकडने कोल्हापूरच्या विक्रम मोरेला १२-२ असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले.