पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडणार आहे.

शहरातील 10 वर्षाखालील, 12 वर्षाखालील व 14 वर्षाखालील एकूण 350 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक अश्विन गिरमे यांनी दिली.

स्पर्धेतील प्रत्येक वयोगटीतील विजेत्या खेळाडूंना 15 हजार रुपये व करंडक तर उपविजेत्या खेळाडूंना 10 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पुणे महानगर पालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे करण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेचे संयोजक व स्थानिक नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे उपस्थित असणार आहेत.