आज पुणेरी पलटण आणि तमील थलाइवाज आमने सामने

प्रो कबड्डीमध्ये आज होणारा शंभरावा सामना पुणेरी पलटण आणि तमील थालइवाज यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्यात आपल्याला प्रो कबड्डीच्या दोन स्टार खेळाडूंचीही लढत बघायला मिळणार आहे, ती म्हणजे पुण्याचा स्टार डिफेंडर संदीप नरवाल आणि तामिलचा कर्णधार अजय ठाकूर.

या मोसमात पुणेरी पलटणने एकूण १२ सामने खेळले असून त्यापैकी ९ सामने जिंकलेले आहेत. पुणेरी पलटणचा मागील सामना दबंग दिल्ली यांच्या विरुद्ध होता. हा सामना पुणेरी पलटणने ३४-२९ असा जिंकला होता. या सामन्यात डिफेंडर गिरीश एर्नाक याने हायफाय मिळवला होता, तर संदिप नरवाल याची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी नव्हती. त्यामुळे या सामन्यामध्ये त्याला आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे.

पुणेरी पलटणचा कर्णधार दिपक निवास हुड्डा याने मागील सामन्यात सर्वाधीक १० गुण मिळविले होते. आजच्या सामन्यात त्याला अन्य रेडर्स कडून मदत मिळणे गरजेचे आहे. राजेश मंडल याला या मसोमात लय गवसली नाही, त्याला आपली कामगिरी उंचवावी लागेल.

तमील थालइवाजचा मागील सामना गुजरात फॉरचूनजायन्टस यांच्याबरोबर चांगलाच रंगला होता. सामन्याचा निकाल शेवटच्या रेड मध्ये लागला. या रेडमध्ये अजय ठाकूरने दोन गुण मिळवून आपलया संघाला जिंकवून दिले. तमील थालइवाजने हा सामना ३५-३४ ने जिंकला. या मोसमात तमील थालइवाजने एकूण १३ सामने खेळलेले असून त्यापैकी ४ सामने जिंकलेले आहेत तर ७ सामने गमावले आहेत. उर्वरित दोन सामने बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश आले आहे. मागील सामन्यात तमील थालइवाजचा कर्णधार अजय ठाकूर याने १४ तर के. प्रपंजन याने ९ गुण मिळवले होते.

या संघातील डिफेंडर अमित हुड्डा आणि संकेत चव्हाण यांची मागील सामन्यात कामगिरी खराब झाल्यामुळे त्यांना या सामन्यात आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे. मागील काही सामान्यांपासून हा संघ विजयी मार्गावर आहे. या संघाने योग्यवेळी लय पकडली असून त्यांना जर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर उर्वरित सामन्यात जास्तीतजास्त विजय मिळवावे लागतील. रेडींगची सर्व जबाबदारी कर्णधार अजय ठाकूरवर असेल तर डिफेन्सची सर्व जबाबदारी अमित हुड्डा याच्यावर असेल.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाना विजयाची सामना संधी असली तरी पुणेरी पलटणचा संघ थोडा उजवा ठरू शकतो. पुणेरी पलटणला जर अजय ठाकूरला रोखण्यात यश आले तर पुणेरी पलटण नक्की बाजी मारेल. मागील दोन्ही सामन्यात तमील संघाने विजय मिळवला असला तरी या सामन्यात पुणेरी पलटण विरुद्ध जिंकण्यासाठी त्यांना रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही पातळ्यांवर उत्तम सांघिक कामगिरी करावी लागेल.