इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- पुणे प्राईडचा हरयाणा हिरोजवर 56-41 असा विजय

पुणे । वेंकटेशा व अमरजीत सिंग यांनी चढाईत तर, जसकिरत सिंग,संदीप खरब यांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर पुणे प्राईड संघाने हरयाणा हिरोजवर 56-41 अशा फरकाने विजय मिळवला. पुणे प्राईडचा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे.हरयाणा संघाकडून सतनाम सिंगने चढाईत चमक दाखवली. सुरुवातीच्या क्वॉर्टरमध्ये हरयाणाकडे आघाडी होती पण, संघाला आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात हरयाणा हिरोज व पुणे प्राईड संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. सतनाम सिंग व मोहीत जाकर यांनी चढाईत केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर हरयाणा हिरोज संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 12-7 अशी आघाडी घेतली. दुस-या सत्रामध्ये पुणे प्राईड संघाने आक्रमक पवित्रा घेत अमरजित सिंग, अब्दुल शेख व वेंकटेशा यांनी जोरदार कामगिरी करत दुस-या क्वॉर्टरमध्ये संघाला 21-7 असे जोरदार पुनरागमन करुन देत मध्यंतरापर्यंत संघाला 28-19 अशी आघाडी मिळवून दिली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये हरयाणा संघाने पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांनी गुणांची कमाई करत पुण्याला चांगली टक्कर दिली. त्यांचा चढाईपटू सतनाम सिंगने चांगली कामगिरी केली. पण, पुणे प्राईड संघाच्या अमरजितने चढाईत आपला फॉर्म कायम ठेवला. त्याला बचावफळीत जितेंदर यादव व जसकिरत सिंग याने चांगली साथ दिल्याने तिस-या क्वॉर्टरमध्ये देखील पुण्याच्या संघाने 13-8 अशी बाजी मारत आघाडी घेतली. चौथ्या क्वॉर्टरमध्ये देखील पुण्याच्या संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवत 15-14 अशी बाजी मारत विजय नोंदवला.

रविवारचे सामने :
– मुंबई चे राजे वि.तेलुगु बुल्स (16 वा सामना ) (8 -9 वाजता)
– हरयाणा हिरोज वि.पाँडिचेरी प्रिडेटर्स (17 वा सामना ) (9-10 वाजता)
– पुणे प्राईड वि.बंगळूरु रायनोज (18 वा सामना) (10-11 वाजता)