पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

शिवशक्ती, डॉ. शिरोडकर या दोन मुंबईच्या संघाबरोबर उपनगरच्या महात्मा गांधी व पुण्याच्या राजमाता जिजाऊ यांनी शिवाई प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली. पुरुषांत विजय बजरंग, अमर क्रीडा मंडळ, अंकुर या तीन मुंबईच्या संघांना ठाण्याच्या ओम कबड्डी संघाचे उपांत्य फेरीत आव्हान असेल.

शिवशक्ती विरुद्ध डॉ.शिरोडकर, महात्मा गांधी विरुद्ध राजमाता जिजाऊ अशा महिलांत, तर विजय बजरंग व्यायाम शाळा विरुद्ध अमर क्रीडा मंडळ, ओम कबड्डी विरुद्ध अंकुर अशा पुरुषांत उपांत्य लढती होतील. महिलांत शिवशक्तीला उपांत्य फेरीत आव्हान तसे सोपे आहे. दुसरी लढत मात्र चुरशीची होईल. पुरुषांत अंदाज वर्तविणे तसे कठीण आहे.

मुंबईतील ना म जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात शिवशक्तीने अमरहिंदचा ५०-१५असा धुव्वा उडविला. महिलांचा एक सामना वगळता अन्य सामने तसे एकतर्फीच झाले.पहिल्या डावात २१-०७अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात देखील त्याच जोशात खेळ करीत सामना लीलया आपल्या नावे केला. अमरहिंदच्या दोन्ही डावातील गुण मिळून देखील शिवशक्तीच्या पहिल्या डावाची बरोबरी होऊ शकत नाही. अपेक्षा टाकळे, रेखा सावंत, प्रियांका कदम, पौर्णिमा जेधे यांच्या झंजावती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमरहिंदच्या दिव्या रेडकर, तेजश्री सारंग बऱ्या खेळल्या.

डॉ. शिरोडकर विरुद्ध मुंबई पोलीस हा सामना चुरशीनें खेळला गेला. यात शिरोडकरने २९-२०अशी बाजी मारली. मेघा कदम, कशिश पाटील, नेहा कदम, धनश्री पोटले यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाने विश्रांतीला १४-१० अशी छोटी आघाडी शिरोडकरने घेतली होती. ती कायम राखत हा विजय साकारला. भक्ती इंदुलकर, सिद्धी वाफेलकर, शिरीषा शेलार, शीतल बावडेकर यांनी पोलिसांचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचा खेळ केला पण त्यात त्या अपयशी ठरल्या.महात्मा गांधीने मीनल व सायली या जाधव भगिनींच्या झंजावती चढायांच्या खेळामुळे होतकरूला ५८-१७असे धुवून काढले.

माजलकरने देखील भक्कम बचाव करीत या भगिनींना छान साथ दिली. महात्माने मध्यांतरालाच ३०-०८अशी भक्कम आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. उत्तरार्धात देखील तोच जोश कायम राखत त्यावर कळस चढविला. चैताली बोऱ्हाडे, सायली परुळेकर यांची आज मात्रा चालली नाही. शेवटच्या सामन्यात राजमाता जिजाऊने संघर्षाचा ४३-२०असा पाडाव केला. पूर्वार्धात सामन्यात काही संघर्षाचे क्षण पहावयास मिळाले. मध्यांतराला राजमाताकडे १८-१२अशी आघाडी होती. सायली केरीपाळे, नेहा घाडगे, स्नेहल शिंदे, अंकिता जगताप, पालवी जमदाडे यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. संघर्षाची मदार कोमल देवकरवर अवलंबून, पण तिच या सामन्यात निस्तेज ठरली. अश्विनी कांबळे, दीपा बुरटे यांनी थोडा फार प्रतिकार केला.पण तो विजया समीप नेण्यास पुरेसा नव्हता.

पुरुषाच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय बजरंगने बंड्या मारुतीला अत्यंत चुरशीच्या लढतीत २९-२६ असे रोखत प्रथम उपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघ शेजारचेच असल्यामुळे सामन्यातील झटापटी बरोबर शाब्दिक चकमकी देखील क्षणाक्षणाला झडत होत्या. मध्यांतराला १७-०७अशी आघाडी घेणाऱ्या विजय बजरंगने उत्तरार्धात देखील जोरदार खेळ करीत सामना एकतर्फी करीत आणला. पण शेवटच्या दहा मिनिटात बंड्या मारुतीच्या विनोद अत्याळकरला सूर सापडला. त्याने भराभर गुण घेत सामन्यात चुरस निर्माण केली. त्याला मंगेश घेगडे, सागर पाटील यांनी भक्कम बचाव करीत छान साथ दिली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ते कमी पडले. विजय बजरंग कडून अक्षय उगाडे, आकाश निकम, अरुण पाटील, अविनाश पाटील यांनी पूर्वार्धात जोशपूर्ण व उत्तरार्धात संयमी खेळ करीत हा विजय साकारला. अमर क्रीडा मंडळाने गोलफादेवीला ४२-१८असे सहज नमविलें. अमित कुळये, रोहित अघटराव, संकेत सावंत, नितीन विचारे अमरकडून, तर विराज उतेकर, सिद्धेश पिंगळे गोलफादेवीकडून उत्तम खेळले.

कल्याणच्या ओमने आपल्या शेजारच्या शिवशंकरला ३४-२६ असे नमविलें. प्रशांत जाधव, अभिजित पाटील, विनायक राणे, शैलेश देवरुखकर यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर मध्यांतराला २४-०८अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. पण उत्तरार्धात शिवशंकरच्या सूरज बनसोडे, गणेश जाधव, सौरभ शिंदे, एलन डिसोझा यांनी आपल्या खेळाचा वेग वाढवीत सामन्यात चुरस निर्माण केली. पण संघाला विजय मात्र ते देऊ शकले नाही. शेवटच्या सामन्यात अंकुरने विजय क्लबचा ४७-२०असा सहज पाडाव करीत आगेकूच केली. सुशांत साईल, अभिजित चव्हाण, किसन बोटे, अक्षय मिराशी यांच्या पल्लेदार चढाई-पकडीच्या खेळामुळे हे सहज शक्य झाले. विजय कडून झैद कवठेकर,श्री भारती बरे खेळले.

या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात १)बंड्या मारुतीने शाहू सडोलीचा (२९-२७); २)अमर क्रीडा मंडळाने जय भारतचा (४७-१४); ३)शिवशंकरने सतेजचा (३०-१६); ४)विजय क्लबने जॉलीचा (३०-२६)असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

कबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी

टी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच

पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!