पुण्याला जास्त गुणांनी हरवणे गरजेचे होते : मनप्रीत सिंग

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटच्या लेगच्या पहिल्या सामन्यात गुजरातने पुण्याला घरच्या मैदानावर ४४-२० ने नमवले. गुजरातचा स्टार रेडर सुकेश हेगडे हा या विजयचा शिल्पकार ठरला. त्याने सामन्यात १५ गुण मिळवले. तर दुसऱ्या बाजूला दीपक निवास हुडा आणि संदीप नरवाल या पुण्याच्या दोनीही स्टार खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोघांनी सामन्यात एक ही गुण मिळवला नाही.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघाचे प्रशिक्षक मनप्रीत यांना संघाच्या यशाबद्दल विचारले असता ते म्हणाले,

“आमचा संघ हा झोन मधला सर्वात चांगला खेळ करणारा संघ आहे. या मोसमाच्या ट्रॉफी आम्हीच जिंकणार याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. मागील काही सामन्यात संघाचे नेतृत्व फझल अंतरानझाली करत आहे. कारण सुकेश हेगडेवर आम्हाला जास्त दबाव द्यायचा नाही. सुकेश हा एक स्टार खेळाडू आहे आणि त्याला आम्हाला मोकळेपणाने खेळू द्यायचे आहे.”

पहिल्या सत्रानंतर सामना जवळ जवळ गुजरातने जिंकलाच होता तरी सुद्धा संघात राखीव खेळाडूंना स्थान का देण्यात आले नाही असे विचारले असता मनप्रीत म्हणाले, ” या झोनमध्ये पहिल्या क्रमांकाच्या लढतीसाठी आमच्यात आणि पुण्यामध्ये लढत आहे. मी संघाला पहिल्या सत्रानंतर विचारले की सर्व खेळाडू बदलायचे का तर सर्वांचे उत्तर आले की आपल्याला पुण्याला मोठ्या फरकाने हरवायचे आहे. मग आम्ही तोच संघ ठेवला आणि त्यामुळेच आम्ही पुण्यासारख्या बलाढ्य संघाला ४४-२० ने हरवू शकलो.”