महेंद्र राजपूतच्या त्या रेडने आम्हाला सामना जिंकून दिला: गुजरातचे प्रशिक्षक मनप्रीतसिंग

 

आज प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाचा शेवटच्या लेगचा शेवटचा दिवस पुणे येथे खेळण्यात आला. या दिवशी झोन एमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहणार याचा निकाल लागणार होता. अतिशय अटीतटीच्या या सामन्यात गुजरातने पुण्याचा एक गुणाने पराभव केला आणि असे करताना गुजरातने झोन एमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले.

दोन्ही संघ पहिल्या सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच डु ओर डाय रेडवर खेळत होते. पहिल्या सत्रात गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा डिफेन्स चालला नाही पण रेडर्सने त्यांना नियमित अंतराने गुण मिळवून दिले आणि सामन्यात बरोबरीत ठेवले. दुसऱ्या सत्रात रेडर्स बरोबरच गुजरातच्या डिफेन्सने ही चांगली कामगीरी केली.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गुजरात संघाच्या प्रशिक्षकांना फजल अत्राचलीच्या कामगिरीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “फझल आणि अबुझार हे दोघेही आमचे सर्वोत्कृष्ट डिफेंडर आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही आजचा सामना जिंकू शकलो. आमचा संघ हा कुणा एक दोन खेळाडूंवर अवलंबून नाही आमचा संघ सांघिक खेळावर विश्वास ठेवतो. अबुझर मेघानी आणि फझल अत्राचली यांच्या जोडीवरवरच आज परवेश भेसवालने ही चांगली कामगिरी केली त्याचबरोबर रेडींगमध्ये सचिननेही गुण मिळवले.”

“दोन्ही संघ डु और डाय रेडवर खेळत होते. त्यामुळे सामना शेवटच्या मिनिटांपर्यंत गेला. आमच्या डिफेन्सवर आम्हाला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आम्ही सामना शेवटच्या मिनिटांपर्यंत जाऊनही यशस्वी ठरलो.”

सामन्याला कलाटणी देणारा क्षण कोणता ठरला असे विचारल्यानंतर मनप्रीत म्हणाले,
“सामना संपण्यासाठी जेव्हा दोन मिनिटे राहिली होती तेव्हा आम्ही आमचा राखीव खेळाडू महेंद्र राजपूत याला मॅटवर आणले आणि त्याने दोन रेडमध्ये आम्हाला तीन गुण मिळवून दिले. त्याचबरोबर पुण्याचा कर्णधार दीपक हुडाही रेडमध्ये बाद झाला आणि आम्हाला सुपर टॅकलचे दोन गुण मिळाले तिथे सामन्याला कलाटणी मिळाली.”