यु मुंबाचा या मोसमातल्या शेवटच्या सामन्यात झाला पराभव

पुणेरी पलटणचे जोरदार प्रदर्शन, महाराष्ट्र डर्बीत ठरले अपराजित

प्रो कबड्डीच्या पुणे लेगमध्ये दुसऱ्या दिवशी १२५ व्या सामन्यात महाराष्ट्रीयन डर्बीचा थरार अनुभवायला मिळाला. पुणेरी पलटण आणि यु मुंबा हे संघ महाराष्ट्रातील संघ पाचव्या मोसमात तिसऱ्या आणि अंतिम वेळेस आमने सामने झाले. या सामन्यात पुणेरी पलटणने जबरदस्त कामगिरी करत मुबा संघाला चारीमुंड्या चीत केले. या सामन्यात दिपक निवास हुड्डाने जबाबदारीने खेळ करत १६ गुण मिळवले. हा सामना पुणेरी संघ ४३-२४ अश्या फरकाने जिंकला.

 

पहिल्या सत्रात पहिल्या रेडमध्ये अनुप कुमारने गुण मिळवत यु मुंबाचे गुणांचे खाते उघडले. त्यानंतरयु मुंबाच्या दुसऱ्या रेडमध्ये श्रीकांत जाधवने गुण मिळवत आघाडी २-० अशी केली. पुणेरी संघाला गुणांचे खाते उघडण्यासाठी दुसऱ्या रेडची प्रतीक्षा करावी लागली. या रेडमध्ये दीपक निवास हुड्डाने गुण मिळवत पुणेरी संघाचे खाते उघडले.

 

सामन्यात १४ व्या मिनिटाला दोन्ही संघ ८-८ अश्या बरोबरीत होते. परंतु सलग कालांतराने गडी बाद होत असल्याने १७व्या मिनिटाला यु मुंबा ऑल आऊट झाली आणि पुणेरी पलटणने १४-९ अशी बढत मिळवली. ऑल आऊट झाल्यानंतर यु मुंबा साठी अनुप कुमार रेडींगला आला त्याला धर्मराज चेरलाथन याने जबरदस्त थाय होल्ड केले आणि पुन्हा मैदानाबाहेर केले.

 

पुणेरी संघाचा कर्णधार दीपक हुड्डा हा या सामन्यात रेडींगमध्ये खूप चांगल्या लयीत होता. त्याने यु मुबा संघाला वेळोवेळी धक्के दिले. पहिले सत्र संपले तेव्हा पुणेरी पलटणसंघाने सामन्यात  १९-११ अशी आघाडी घेतली होती. यु मुंबा संघाचा फक्त एक खेळाडू मैदानात बाकी होता.

 

दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला यु मुबा दुसऱ्यांदा ऑल आऊट झाली आणि पुण्याने २५-११ अशी बढत मिळवत सामन्यात पूर्णपणे वर्चस्व स्थापन केले. हा सामन्यात यु मुबाला परतण्याची कोणतीच संधी पुणेरी संघाने दिली नाही. ३४ व्या मिनिटाला यु मुबा तिसऱ्यांदा ऑल आऊट झाली आणि पुण्याने ३९-२० अशी बढत मिळवली.

 

या सामन्यात यु मुबा संघाला सामन्यात डोके वर काढण्याची संधी दिली नाही. रेडींग आणि डिफेन्समध्ये यु मुबा संघाला पुणेरी संघाने संधीच दिली नाही.  हा सामना पुणेरी संघाने  ४३-२४ असा मोठ्या फरकाने जिंकला.