घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात पुण्याचा गुजरातकडून दारूण पराभव !

मोठ्या संख्येने आलेल्या पुण्याचा प्रेक्षकांची पराभवामुळे निराशा

पुणे । प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटच्या लेगला आज पुण्याच्या शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे सुरवात झाली.

घरच्या मैदानावर चांगला खेळ करून पुणे होम लेगची गोड सुरुवात करेल अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा होती, परंतु गुजरातच्या ऑलराऊंड खेळापुढे पुण्याच्या संघाचा टिकाव लागला नाही. गुजरातने पुण्याच्या संघाला ४४-२० असे पराभूत केले.

पहिल्या रेड मधेच पुण्याचा कर्णधार दीपक निवास हुडाला गुजरातच्या संघाने बाद केले. रिडींग बरोबरच डिफेन्समधेही पुण्याच्या संघाला विशेष कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सत्रात डिफेन्सकडे फक्त १ सुपर टेकल आणि १ डेफन्सचा गुण होता.

विशेष म्हणजे दीपकला पहिल्या सत्रात एकही गुण कमवता आला नाही. पहिल्या सत्रात १४व्या मिनिटाला पुण्याचा संघ सर्वबाद झाला. पहिले सत्र संपले तेव्हा पुण्याकडे ७ गुण होते तर गुजरातकडे १७ गुण होते.

दुसऱ्या सत्राच्या चौथ्या मिनिटाला पुण्याचा संघ सर्वबाद झाला. गुजरातसाठी रेडींगमध्ये नियमित कर्णधार सुकेश हेगडे जो की या सामन्यात गुजरातचे नेतृत्व करत नव्हता त्याने उत्तम खेळ केला. त्यामुळेच ३५व्या मिनिटाला पुण्याचा संघ पुन्हा एकदा सर्वबाद झाला.

पुण्याकडून मोनूने ऑलराऊंड खेळ करत ३ गुण मिळवले तर रेडींग मध्ये सुरेश कुमारने ६ तर राजेश मोंडलने ३ गुण मिळवले. या पराभवाला पुण्याच्या २ स्टार खेळाडूंचे म्हणजेच संदीप नरवाल आणि दीपकनिवास हुडा यांचा खराब फार्म ठरला.

गुजरातकडून सुकेश हेगडेने १५ गुण मिळवत संघाला विजय मिळवून दिला. डेफन्समध्ये सुनील कुमार या खेळाडूने चांगली कामगिरी करत ७ गुण मिळवले. पहिल्यापासूनच गुजरातचा संघ पुण्यावर चांगलाच हावी झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे ४४-२० ही गुणसंख्या.